काँग्रेस उमेदवाराच्या गाडीवर भाजप समर्थकांचा हल्ला ?
BJP supporters attack on Congress candidate's car?

लोकसभेसाठी काँग्रेसने आठ राज्यांतील ५७ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील सात जागांवरील उमेदवारांच्या नावांच्या घोषणा करण्यात आली आहे.
सोलापूर लोकसभेसाठी आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. माझ्या गाडीवर भाजपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप प्रणिती शिंदे यांनी केला आहे. गुरुवारी रात्री हा प्रकार घडल्याचे त्यांनी सांगितले.
काही दिवसांपासून प्रणिती शिंदे या सोलापूर जिल्ह्यात मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. त्या पंढरपूर तालुक्याच्या दौऱ्यावर होत्या.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सध्या राज्यभरात लोकप्रतिनिधींना गाव बंद आंदोलन सुरू आहे. गाव बंदी असताना गावात येणाऱ्या लोकप्रतिनिधींना जाब विचारण्याचे काम सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात येत आहे.
गुरुवारी दुपारी पंढरपूर तालुक्यात आल्यानंतर त्यांना मराठा समाजाकडून जाब विचारण्यात आला. त्यानंतर त्यांनी भाजपच्या नेत्यांनाही गाव बंदी करावी, अशी मागणी केली होती.
त्या सरकोलीतून सोलापूरकडे येत असताना त्यांची गाडी अडवण्यात आली. त्यावेळी आपल्या गाडीवर भाजप समर्थक लोकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप प्रणिती शिंदे यांनी केला आहे.
“ते मराठा आंदोलक नव्हते मराठा आंदोलकाच्या नावाने भाजपचे लोक मराठा समाजाचे आरक्षणाचे आंदोलन बदनाम करीत आहेत,” असेही प्रणिती शिंदे यांनी म्हटले आहे.
मराठा समाजाने पुकारलेल्या गावाबंदीला प्रणिती शिंदेंनी समर्थन दिले आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेला त्यांनी पाठिंबा दर्शवला आहे.
सोलापूर लोकसभेसाठी प्रणिती शिंदे यांचे नाव जाहीर झाल्यानंतर महायुतीकडून कोण उमेदवार असणार, याबाबत सध्या चर्चा सुरु आहे.
माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार राम सातपुते या तरूण चेहऱ्याला भाजप सोलापूर लोकसभेसाठी मैदानात उतरविणार असल्याची शक्यता आहे.
त्यामुळे आमदारांविरुद्ध आमदार असा सामना सोलापूर लोकसभा मतदारसंघात रंगणार असल्याचे चित्र आहे. अभ्यासू, आक्रमक, तरूण चेहरा म्हणून आमदार सातपुतेंची ओळख आहे
काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसकडून महाराष्ट्रातील एकूण 7 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे.
उर्वरित उमेदवारांची घोषणा देखील लवकरच होण्याची शक्यता आहे. दरम्यान, काँग्रेस महाराष्ट्रात 48 पैकी एकूण 18 जागांवर निवडणूक लढवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
काँग्रेसने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत पुण्यातून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर नांदेडमधून वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
विशेष म्हणजे कोल्हापूरहून शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर नंदुरबारमध्ये गोवाल पाडवी यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
सोलापूर – प्रणिती शिंदे, कोल्हापूर – शाहू महाराज छत्रपती, पुणे – रवींद्र धंगेकर, नंदुरबार – गोवाल पाडवी, अमरावती – वळवंत वानखेडे, लातूर – डॉ. शिवाजी कलगे आणि नांदेड – वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे.