मंत्रिपदासाठी इच्छूक शिंदे गटाचा नेता म्हणाला ;आपण बिहारच्या मार्गाने चाललोय
Leader of Shinde group aspiring for ministerial post said; We are following the path of Bihar
महाराष्ट्रातील सत्तास्थापनेनंतर आता नुकतंच महायुती सरकारमधील मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. यावेळी महायुतीच्या 39 मंत्र्यांनी शपथ घेतली.
यात 33 कॅबिनेट मंत्री तर 6 राज्य मंत्र्यांचा समावेश आहे. यात भाजपचे 19 मंत्री, शिवसेनेचे 11 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 9 मंत्र्यांचा समावेश आहे.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. त्यापूर्वी आता महायुतीत नाराजीनाट्य पाहायला मिळत आहे.
मंत्रिपदासाठी इच्छूक असलेल्या अनेक आमदारांना मंत्रिमंडळ विस्तारात डावलण्यात आले आहे. त्यामुळे अनेकांची मंत्रिपदाची संधी हुकली आहे.
त्यामुळे अनेकजण उघड नाराजी व्यक्त करत आहेत. त्यातच आता शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी मंत्रीपद न मिळाल्याने संताप व्यक्त केला आहे. नुकतंच त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना थेट वरिष्ठ नेतृत्वांवरच हल्ला केला.
“माझ्यासाठी मंत्रिपद इतकं महत्त्वाचं नाही. मला लोकांनी निवडून दिलंय, मला त्यांच्यासाठी काम करायचं आहे. पण दु:ख एवढंच आहे की महाराष्ट्र नेमका चाललाय कुठे? तुम्हाला विभागीय दिले जायचे.
पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ यासारख्या लोकांच्या हातात सत्ता देत महाराष्ट्र आम्ही पुढे नेला होता. आपण कुठे तरी आता मागे चाललोय. आपण बिहारच्या मार्गाने चाललोय”, असे विजय शिवतारे म्हणाले.
“मला नाव कट झाल्याबद्दल अजिबात दु:ख नाही. पण ज्यापद्धतीने विश्वासात घेऊन काम करायला हवं, पण ते न झाल्याने नाराजी १०० टक्के आहे. अडीच वर्षानंतर मंत्रिपद दिलं तरी मी घेणार नाही.
मला गरज नाही. माझ्या मतदारसंघातील कामे मुख्यमंत्री आणि इतरांकडून करुन घेणे, इतकंच आहे. मंत्रिपदावरुन मला राग नाही. पण वागणुकीवरुन प्रचंड राग आहे”, असे विजय शिवतारे यांनी म्हटले.
दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिपदावरुन नाराज झालेल्यांवरही भाष्य केले आहे. मंत्रिपदं न मिळाल्याने नाराज होऊन पक्षाच्या कार्यपध्दतीवर टीका करणाऱ्यांचा भविष्यात वेगळा विचार केला जाईल.
श्रध्दा आणि सबुरी ठेवा. कुणावरही अन्याय होऊ देणार नाही. काम करणाऱ्यांचा सन्मान ठेवला जाईल. योग्य वेळी त्यांना न्याय दिला जाईल” अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे.