छगन भुजबळ ,अजित पवार, प्रफुल्ल पटेलांवर प्रचंड संतापले म्हणाले,“मी तुमच्या…..

He was very angry with Chhagan Bhujbal, Ajit Pawar, and Praful Patel and said, "I am your.....

 

 

 

देवेंद्र फडणवीस सरकारचा विस्तार नुकताच पार पडला आहे. मात्र, या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) वरिष्ठ नेते तथा माजी मंत्री छगन भुजबळ यांना स्थान देण्यात आलेलं नाही.

 

त्यामुळे भुजबळांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला आहे. स्वतः भुजबळ यांनी देखील यावरून नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, भुजबळांच्या नाराजीबद्दल बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधील (अजित पवार) वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल म्हणाले,

 

“छगन भुजबळांना राज्यसभेवर जायचं होतं, आम्ही त्यांना राज्यसभेवर पाठवण्याची तयारी दर्शवली आहे”. पटेलांच्या या वक्तव्यावर छगन भुजबळ यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

 

ते म्हणाले, “सहा महिन्यांपूर्वी मी राज्यसभेवर जायची इच्छा व्यक्त केली होती. मात्र तेव्हा मला नकार देण्यात आला आणि आता मी आमदार म्हणून निवडून आलो आहे तर आता मला राज्यसभेवर जायला सांगतायत. मी काय तुमच्या हातातलं खेळणं आहे का?”

 

प्रफुल पटेल यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना छगन भुजबळ म्हणाले, “नक्कीच मी सहा महिन्यांपूर्वी राज्यसभेवर जाण्याची इच्छा वरिष्ठांपुढे व्यक्त केली होती.

 

परंतु, तेव्हा त्यांनी मला नकार दिला. ते मला म्हणाले, ‘आता आपण सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवणार आहोत’. त्यावर माझी काही हरकत नव्हती.

 

त्यानंतर त्यांनी मकरंद पाटील यांच्या भावाला राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला. तेव्हा देखील मी राज्यसभेचा विषय काढला होता. मात्र वरिष्ठांनी मला नकार दिला.

 

त्यांनी सांगितलं की ‘आम्ही मकरंद पाटील यांना शब्द दिला आहे’. तेव्हा मला सांगण्यात आलं की ‘तुम्ही विधानसभेची निवडणूक लढवली पाहिजे. तुमच्याशिवाय येवला मतदारसंघात विजय मिळणं कठीण आहे.

 

तुम्ही निवडणूक लढत असाल तर आपले कार्यकर्ते जोमाने राज्यभर काम करतील’. मी त्यावरही हरकत घेतली नाही. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत मी व माझ्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि आता मी विधानसभा निवडणुकीत जिंकलो आहे.

 

आता ते लोक मला म्हणतात की ‘आपण मकरंद पाटील यांना मंत्री केलं आहे. आता त्यांच्या भावाला आपण राजीनामा द्यायला सांगू आणि तुम्हाला आपण राज्यसभेवर पाठवू’.

 

परंतु, त्यासाठी मला विधानसभेचा राजीनामा द्यावा लागेल. मी असं केलं तर ही माझ्या मतदारसंघातील लोकांची प्रतारणा होणार नाही का? मी काय तुमच्या हातातलं खेळणं आहे का?”

छगन भुजबळ प्रफुल्ल पटेल व अजित पवारांवरील नाराजी जाहीर करत म्हणाले, “मला त्यांना विचारायचा आहे, मी तुमच्या हातातलं लहान खेळणं आहे का?

 

तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही मला म्हणाल, राज्यसभेवर जा, तुम्ही म्हणाल बस तेव्हा बसायचं, तुम्ही उठ म्हणाल तेव्हा उठायचं, तुम्ही म्हणाल तेव्हा निवडणूक लढवायची… ते सगळं जाऊ द्या,

 

मी जर उद्या माझा राजीनामा दिला तर माझ्या मतदारसंघातील लोकांना काय वाटेल? ज्या कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी मेहनत घेतली त्यांना काय वाटेल? त्यांनी माझ्यासाठी जीवाचं रान केलं आहे

 

आणि आता निवडणूक झाल्यावर महिनाभरात मी राजीनामा कसा देऊ? उलट मी माझ्या वरिष्ठांना म्हटलं की मला थोडे दिवस द्या.

 

माझ्या मतदारसंघातील कामं मला पूर्ण करू द्या. एक-दोन वर्षांनी आपण यावर विचार करू. परंतु, तुम्ही म्हणाल बस बस तर मी बसायचं… तुम्ही म्हणाल उठ उठ तर मी उठायचं… हा छगन भुजबळ तसा माणूस नाही”.

 

सात महिन्यांपूर्वी देशात लोकसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठं अपयश पाहावं लागंल होतं.

 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांना नाशिकमधून लोकसभेची निवडणूक लढवण्याची इच्छा आहे, अशा बातम्या त्यावेळी प्रसिद्ध झाल्या होत्या.

 

भुजबळांनी लोकसभेची तयारी देखील केली होती. मात्र, त्यांना महायुतीकडून लोकसभेचं तिकीट मिळालं नाही. उशिरापर्यंत नाशिकचा उमेदवार महायुती जाहीर करू शकली नव्हती.

 

भुजबळांनी त्यावेळी या सर्व घडामोडींवर प्रतिक्रिया देणं टाळलं होतं. मात्र, आता भुजबळ यांनी सांगितलं की “मी महिनाभर नाशिक लोकसभेची तयारी केली होती.

 

मात्र महायुतीच्या लोकांनी तेव्हा कच खाल्ली”. सात महिन्यांपासून भुजबळांच्या मनात जी खदखद होती ती आज बाहेर पडली.

 

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातून वगळल्यानंतर भुजबळांनी पक्षावर नाराजी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर त्यांनी लोकसभा निवडणुकीवेळी जे काही घडलं ते देखील सांगितलं आहे. यासह प्रफुल्ल पटेल यांनी दिलेल्या स्पष्टीकरणावरही भुजबळांनी संताप व्यक्त केला आहे.

 

छगन भुजबळ यांनी काही वेळापूर्वी नाशिकमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांऱशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले,

 

“महायुतीतील वरिष्ठ नेत्यांनी मला सांगितलं होतं की तुम्ही लोकसभा निवडणुकीला उभे राहा. होळीच्या दिवशी ही सगळी चर्चा झाली होती.

 

मला सांगण्यात आलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले आहेत की छगन भुजबळ यांना नाशिकमधून लोकसभा निवडणुकीला उभं करू.

 

मला हे सांगण्यात आल्यानंतर मोठा धक्का बसला. मी सर्वांना सांगितलं की मला विचार करण्यासाठी थोडा वेळ द्या. मला किमान २४ तास द्या, मी विचार करून सांगतो.

 

त्यानंतर होकार कळवला. मी महिनाभर माझ्या मतदारसंघात तयारी केली. परंतु, देशभरातील उमेदवारांची नावे जाहीर होत होती. महाराष्ट्रातील कित्येक उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. मात्र, नाशिकमधून माझं नाव जाहीर केलं गेलं नाही”.

छगन भुजबळ म्हणाले, “मी नाशकात सर्व तयारी केली होती. मी नाशिकमधून लोकसभेची निवडणूक लढत आहे हे समजल्यानंतर या मतदारसंघातील दलित, मुस्लिम, आदिवासी व ब्राह्मण संघटनांचे पदाधिकारी मला भेटले.

 

या सर्व संघटना माझ्याबरोबर उभ्या राहिल्या. कारण या सगळ्यांना नाशिकच्या विकासामध्ये रस होता. दुसऱ्या बाजूला लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील जवळपास सर्व उमेदवारांची नावे जाहीर होत होती.

 

परंतु, माझं नाव जाहीर केलं नाही. मग मी त्यांना (महायुतीमधील वरिष्ठ नेते) म्हटलं, आता मी माघार घेतो. मी तुमच्या निर्णयाकडे आस लावून, डोळे लावून बसणार नाही, तुमच्या तिकिटाची वाट बघणार नाही. तेव्हा या लोकांनी कच खाल्ली आणि मला तिकीट दिलं नाही.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *