परभणीच्या घटनेवरून अशोक चव्हाण ,राहुल गांधींना म्हणाले ,‘हे उचित नाही’
Ashok Chavan told Rahul Gandhi on Parbhani incident, 'This is not fair'
परभणीत हिंसाचारानंतर पोलीस कोठडीत 35 वर्षीय वकील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या झालेल्या मृत्यूवरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. या घटनेवरुन पोलिसांवर गंभीर आरोप केला जातोय.
पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशी यांना इतकी मारहाण केली की त्यांचा मृत्यू झाला, असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. विशेष म्हणजे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल परभणीत जावून भेट घेतली.
यानंतर त्यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत सोमनाथ सूर्यवंशी हे दलित असल्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला होता.
त्यांच्या या आरोपांना भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. भाजप खासदार तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राहुल गांधी यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे.
“सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या झाली का हे चौकशीनंतर स्पष्ट होईल. पण कोणी व्यक्ती एखाद्या समाजाचा आहे म्हणून त्याची हत्या मुद्दामून करण्यात आली असा निष्कर्ष चौकशी पूर्वी काढणे हे उचित नाही”,
अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी दिली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.
दलित असल्यामुळे सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या करण्यात आली, असा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. त्यावर अशोक चव्हाण यांनी टीका केली.
“राहुल गांधी यांचा परभणी दौरा हा राजकीय होता आणि राजकीय दौऱ्याच्या माध्यतून त्यांनी राजकारण करण्याच्या उद्देशाने त्यांनी हे स्टेटमेंट दिले आहे. त्यात सत्यता नाही”, असं अशोक चव्हाण म्हणाले.
“काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काय बोलले मला माहिती नाही, पण साकोलीच्या जनतेने त्यांची लायकी काय हे दाखवली आहे”, अशी खोचक टीका देखील खासदार अशोक चव्हाण यांनी केली.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनीदेखील परभणीत जावून सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे.
शरद पवार यांनी सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेऊन नेमकं काय काय घडलं होतं? याची माहिती जाणून घेतलं. यावेळी शरद पवारांनी सूर्यवंशी कुटुंबाला आरोपींवर कठोर कारवाई होईल, याची ग्वाही दिली.