पालकमंत्रिपदाचा तिढा आता अमित शाहांच्या दरबारात

The battle for the position of guardian minister is now in Amit Shah's court.

 

 

रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा वाद गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चिघळल्याचे पाहायला मिळत आहे. नाशिक जिल्ह्यासाठी भाजपचे गिरीश महाजन आणि रायगडमध्ये अजित पवार गटाच्या अदिती तटकरे यांची 18 जानेवारीला पालकमंत्रीपदी नियुक्ती केल्यानंतर शिवसेनेत प्रचंड नाराजी पसरली होती.

 

त्याच रात्री शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांचे समर्थक थेट मुंबई-गोवा महामार्गावर उतरले. त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले, टायर जाळून रस्ता अडवला.

 

तर नाशिकमध्ये देखील मंत्री दादा भुसे यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली. यानंतर अवघ्या एक दिवसातच नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती.

 

आता महिना उलटून देखील या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अजूनही कायम आहे. आता नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कोर्टात पोहोचल्याची माहिती समोर येत आहे.

 

रायगडच्या पालकमंत्रिपदावर शिंदेसेनेने दावा केला होता. रायगड जिल्ह्यात शिंदेसेनेचे तीन आणि भाजपचे तीन आमदार आहेत. शिंदेसेनेचे भरत गोगावले यांना रायगडचे पालकमंत्रिपद हवे आहे.

 

मात्र, जिल्ह्यात अजित पवार गटाचा एकच आमदार असूनही पालकमंत्रिपद अदिती तटकरेंना देण्यात आले होते. त्यामुळे शिवसेना शिंदे गट आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते.

 

नाशिकच्या पालकमंत्रिपदी महायुतीत शिंदेसेनेचे दादा भुसे आग्रही होते. नाशिकचे पालकमंत्रिपद भाजपने गिरीश महाजन यांना दिल्याने दादा भुसे नाराज झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.

 

तर दुसरीकडे नाशिकमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सर्वाधिक आमदार असल्याने पालकमंत्रिपद राष्ट्रवादीला मिळावे, असे म्हणत कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दावा ठोकला होता.

 

या पार्श्वभूमीवर नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा महिना उलटून देखील सुटलेला नाही. आता रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा अमित शाह यांच्या कोर्टात गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

 

भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वरिष्ठ नेत्यांशी अमित शाह चर्चा करणार आहेत. यानंतर नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

दरम्यान, नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीच्या तिन्ही पक्षांत रस्सीखेच सुरू असताना राष्ट्रवादीचे मंत्री माणिकराव कोकाटे यांना

 

मुख्यमंत्री कोट्यातून दिल्या जाणाऱ्या सदनिका बनावट दस्तऐवज तयार करून लाटल्या प्रकरणी दोन वर्षाची शिक्षा नाशिक जिल्हा न्यायालयाने सुनावली आहे.

 

त्यांना दोन तासांत जामीन मिळाला असला तरी घडलेल्या या प्रकरणानंतर नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस बॅकफूटवर आल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *