नगर परिषदेच्या पथकास शिवीगाळ; मानवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल!
Abuse of Municipal Council team; Case registered at Manavat Police Station!
मानवत शहरातील खंडोबा रोडवरील चंदनेश्वर सार्वजनिक शौचालयाच्या ८४ बाय ८४ फूट जागेवर अतिक्रमण करून विना परवाना बांधकाम करण्यात आल्याच्या तक्रारीवरून,
नगर परिषदेच्या आदेशाने पाहणी करण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ आणि धमकी देण्याचा प्रकार घडला. या प्रकरणी १७ मार्च रोजी मानवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी राजेश मुरलीधर शर्मा (वरीष्ठ लिपिक, नगर परिषद, मानवत) यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार,पोलिसात दिलेल्या तक्रारीत नमूद केले कि., १७ मार्च रोजी दुपारी १:३० वाजता नगर परिषदेच्या पथकाने सदर अतिक्रमित जागेची पाहणी करण्यासाठी भेट दिली.
या पथकात रचना सहाय्यक अजय चंद्रकांत उडते, कार्यालयीन अधीक्षक भगवान शिंदे, कनिष्ठ लिपिक मनमोहन बारहत्ते, लिपिक नारायण व्यवहारे, शिपाई संजय कुहाडे, सफाई कामगार राजेश भदर्गे आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.
नगर परिषद मानवतने हरी विठ्ठल करपे यांच्याकडून संपादित केलेल्या खंडोबा रोड येथील सर्व्हे नंबर ३६७ मधील (घर नंबर ३-१-३५) सार्वजनिक शौचालयाच्या ८४ बाय ८४ फूट जागेवरील अतिक्रमणाची पाहणी करण्यासाठी हे पथक गेले असता, लक्ष्मण हरिभाऊ करपे, सुरेंद्र लक्ष्मण करपे, ओमप्रकाश हरिभाऊ करपे आणि रविंद्र लक्ष्मण करपे यांनी अधिकाऱ्यांना विरोध केला.
पथक पाहणी करत असताना, रविंद्र करपे याने अधिकाऱ्यांना “तुम्हाला येथे मोजमाप करू देणार नाही, तुम्ही काहीही करू शकत नाही” असे म्हणत शिवीगाळ केली. तसेच, “जर तुम्ही इथून गेलात नाही तर मी आत्महत्या करीन” अशी धमकी दिली.
त्याचप्रमाणे, लक्ष्मण करपे यांनी सफाई कामगार रविंद्र धबडगे याच्या हातातील मोजमाप टेप हिसकावून घेतली आणि त्याला धक्काबुक्की केली. ओमप्रकाश करपे यांनी दगड उचलून मारण्याचा प्रयत्न केला, तर सुरेंद्र करपे यांनी अधिकाऱ्यांना अश्लील शिवीगाळ करत मारहाण केली.
या प्रकारामुळे शासकीय कामात अडथळा आल्याने फिर्यादी राजेश मुरलीधर शर्मा यांच्या तक्रारीवरून वरील चार आरोपींविरुद्ध मानवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मानवत पोलिस करत आहेत.