महाराष्ट्रात ‘या’ मुहूर्तावर मान्सून ; वादळी पाऊस अन् अवकाळी
Monsoon arrives in Maharashtra at 'this' time; stormy rains and unseasonal rains

अंदमान आणि निकोबार बेटांवर मान्सूनच्या आगमानास सुरुवात झाली असून, या वाऱ्यांचा एकंदर वेग पाहता यंदाच्या वर्षी केरळात हे वारे मे महिन्यातच दाखल होणार असल्याचा प्राथमिक अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
मान्सूनचं आगमन ठरल्याप्रमाणं होत असतानाच इथं महाराष्ट्राच मात्र हवामान बदलानी नागरिकांच्या आणि प्रामुख्यानं बळीराजाच्या चिंतेत भर टाकली आहे.
पुढील 24 तासांसाठी राज्याच्या पश्चिम, मध्य आणि विदर्भ क्षेत्रातील काही भागांना वादळी पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. या भागात गारपिटीचाही तडाखा बसणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्रात प्रामुख्यानं सातारा आणि कोल्हापूर इथं जोरदार पावसाची शक्यता आहे. तर, पुण्यात आकाश अंशत: ढगाळ असेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
अरबी समुद्राच्या मध्यापासून ते थेट गुजरातपर्यंत आणि मराठवाडा ते तामिळनाडूपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याच कारणानं मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्गातही आकाश झाकोळलेलं दिसून येत आहे.
तर, छत्रपती संभाजीनगर आणि विदर्भाच्या बहुतांश भागांवरही या वादळी पावसाची वक्रदृष्टी असेल असा स्पष्ट इशारा हवामान विभागानं देत नागरिकांना सतर्क केलं आहे.
देश स्तरावर केंद्रीय हवामानशास्त्र विभागानं जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश या भागांसह उत्तराखंड आणि राजस्थानमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
यादरम्यान ताशी 50 ते 60 किमी इतक्या वेगानं वारे वाहतील असाही इशारा देण्यात आला आहे. देशाच्या दक्षिणेकडे 11 ते 15 मे दरम्यान मान्सूनपूर्व पाऊस जोर धरणार असून, त्यामुळं तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश अशी राज्य प्रभावित होतील.
सध्या मोसमी वारे निकोबार बेटांवर दाखल झाले आहेत. ज्यामुळं 27 मेपर्यंत मान्सून केरळ किनारपट्टीवर पोहोचणार असल्याचं चित्र दिसत आहे.
मुख्य म्हणजे मागील 17 वर्षांत प्रथमच मान्सून 4 दिवस आधी केरळात येणार असून, 6 जूनपासून मान्सूनचा महाराष्ट्रातील प्रवास सुरू होण्यास पोषक वातावरण पाहायला मिळत आहे.
ज्यामुळं यंदा तीन दिवस आधीच मान्सून राज्यात दाखल होईल. तत्पूर्वी मात्र वादळी पाऊस आणि गारपीटसदृश्य वातावरणामुळं मान्सूनची पार्श्वभूमी तयार होईल असं म्हणणं गैर नाही.
मान्सून यंदा वेळेआधीच दाखल होणार असल्याची चिन्ह निर्माण झाली आहे. नैऋत्य मान्सून दक्षिण अंदमान समुद्र, दक्षिण-पूर्व बंगालच्या उपसागराच्या काही भागांत आला आहे.
तसेच निकोबार बेटांवर 13 मे पर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. येत्या चार ते पाच दिवसांत मान्सून दक्षिण अरबी समुद्र, मालदीव, कोमोरिन क्षेत्राच्या काही भागात येणार आहे.
जेष्ठ हवामान शास्त्रज्ञ के.एस.होसाळीकर यांनी याबाबतची माहिती दिली आहे. भारतीय हवामान विभागाने दोन दिवसांपूर्वी केरळमध्ये वेळेच्या चार दिवसांपूर्वी मान्सून येणार असल्याचे म्हटले आहे.
2008 नंतर म्हणजेच 18 वर्षांनी मान्सून नियोजित वेळेच्या चार दिवस आधी केरळमध्ये येणार आहे. सध्या मान्सून दक्षिण अंदमान बेटावर आला आहे. 15 मे नंतर त्याची प्रगती वेगाने होणार आहे.
त्यानंतर तो दक्षिण अरबी समुद्रात प्रवेश करेल आणि श्रीलंकेचा काही भाग, दक्षिण बंगाल उपसागराचा काही भाग, संपूर्ण अंदमान बेट व्यापणार आहे.
केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची तारीख 31 मे आहे. परंतु यंदा 27 मे रोजीच मान्सून पोहचणार आहे. गोव्यामध्ये पाच जून तर महाराष्ट्रातील किनारपट्टी भागांत 6 जूनपर्यंत मान्सून येण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागाने यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. 106 टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.
पावसासंदर्भात भारतीय हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज 2015 वगळता गेल्या 20 वर्षांत बरोबर ठरला. यंदा अल निनो किंवा ला निना याबाबत कोणतीही परिस्थिती उद्भवणार नसल्याचे म्हटले आहे.
मान्सून कधी कुठे पोहचणार?
5 जून : गोवा, आंध्र प्रदेश किनारपट्टी, कर्नाटक, पश्चिम बंगाल.
6 जून : महाराष्ट्र, आंध्र प्रदेशचे किनारपट्टी व्यतिरिक्त जिल्हे.
10 जून : मध्य महाराष्ट्र, मुंबई, तेलंगणा, छत्तीसगड, ओडिसा, झारखंड, बिहार.
15 जून : गुजरात, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश.
20 जून : गुजरात, राजस्थान, उत्तराखंड, दिल्ली.
25 जून : राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश.
30 जून : राजस्थान, नवी दिल्ली.
हवामान विभागाने राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. पुढील तीन-चार दिवसांत राज्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे.
हवामान विभागाकडून पुढील चार दिवस पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असल्याने जळगाव जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
दरम्यान सोमवारी जळगाव जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असल्याने नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले.