अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार ? खासदाराच्या वक्तव्याने खळबळ
Ashok Chavan will join BJP; sensational with Khasdar's statement
चार राज्यांचे निकाल लागल्यानंतर भाजपचा प्रचंड आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे भाजपने आता लोकसभेची जय्यत तयारी सुरू केली आहे.
त्यासाठी भाजपने जिल्ह्याजिल्ह्यात तयारी सुरू केली आहे. भाजपला निवडणुकीत मिळणारं यश कायम असल्याने भाजपमध्ये येणाऱ्यांची संख्या नजीकच्या काळात वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
येत्या काळात महाराष्ट्रात काँग्रेसमध्ये महाभूकंप येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसचे सर्वात मोठे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपमध्ये लवकरच प्रवेश करणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
भाजप खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी हा दावा केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपामध्ये येण्यास इच्छुक असल्याचे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केल्याची प्रतिक्रीया नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली आहे.
काल गुरुवारी बावनकुळे नांदेड दौऱ्यावर होते. मुखेड आणि नांदेड शहरात त्यांनी 100 सुपर वॉरियर्सची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी
अशोक चव्हाण भाजपात येण्यास इच्छुक असल्याचे कार्यकर्त्यांसमोर सांगितल्याचे खासदार चिखलीकर म्हणाले. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
चंद्रशेखर बावनकुळे काल 100 वॉरियर्सच्या बैठकीला आले होते. यावेळी बावनकुळे यांनी महत्त्वाची विधाने केली. भाजपचा दुपट्टा टाकण्यासाठी अनेक लोकं लाईनला आहेत.
त्यांनी काही काँग्रेस नेत्यांचा उल्लेख केला. ही बाब जुनी आहे. अशोक चव्हाण यांच्या साखर कारखान्याची दीडशे कोटी रुपयांचे थकहमी मागच्या सरकारने माफ केली नाही.
पण भाजपाच्या नेत्यांकडे जेव्हा चव्हाण गेले तेव्हा महायुती सरकारने थकहमी दिली. यावरून लक्षात घेतले पाहिजे. अशोक चव्हाण सत्तेसाठी येऊ शकतात. त्यांच्यासाठी हे काही नवीन नाही. आम्ही त्यांचे भाजपात स्वागत करू, असं चिखलीकर म्हणाले.
दरम्यान, चिखलीकर यांच्या या दाव्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी सूचक विधान केलं आहे.आम्ही कुणाकडे जात नाही, पक्ष फोडायला जात नाही. पण कुणी भाजपचा दुपट्टा घालणार असेल तर त्यांचं स्वागतच आहे, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांनीही या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ती त्यांच्या पक्षाची बाब आहे.
त्यावर मी बोलणे योग्य होणार नाही. कोण येणार आणि कोण जाणार हे त्यांच्या पक्ष नेतृत्वाने ठरवावं, असं अत्राम म्हणाले. कोण कोणत्या पक्षात जाईल याचा काही नेम नाही, असे वक्तव्य नितीन गडकरी यांनी केले होते.
यावर बोलताना धर्मराव बाबा आत्राम म्हणाले की, सगळे लोक इकडे तिकडे जाण्याच्या तयारीमध्ये आहेत. सध्या महायुतीचं सरकार आहे. अनेक असंतुष्ट लोक महायुतीमध्ये येण्याच्या तयारीमध्ये आहेत, असंही अत्राम म्हणाले.