महाविकास आघाडीचे या १४ जागांमुळं जागावाटप अडले
Due to these 14 seats of Mahavikas Aghadi, seat allocation was blocked
लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सर्व राजकीय पक्ष लागलेले आहेत. महाराष्ट्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, काँग्रेस, समाजवादी पार्टी, वंचित बहुजन आघाडी, शेकाप
हे महाविकास आघाडी म्हणून लोकसभा निवडणुकीला सामोरं जाण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या दोन बैठका पार पडल्या आहेत.
या दोन बैठकानंतर ३४ जागांवर सर्व पक्षांची सहमती असल्याचं समोर आलं आहे. मविआत १४ जागांवर अद्याप सहमती झालेली नसल्याचं समोर आलं आहे.
मविआची जागा वाटपाची तिसरी बैठक उद्या पार पडणार आहे. त्या बैठकीत या बाबत तोडगा निघतो का हे पाहावं लागणार आहे.
महाविकास आघाडीनं राज्यातील ४८ पैकी जास्तीत जास्त जागांवर विजय मिळवण्यासाठी रणनीती आखली आहे. मविआचं जागा वाटप करताना ज्यांचा उमेदवार विजयी होऊ शकतो त्यांना ती जागा मिळेल
या निकषावर करण्यात येणार होतं. त्यानुसार आतापर्यंत ३४ जागांचा तिढा सुटला आहे. उर्वरित १४ जागांवरील तिढा सोडवण्यासाठी उद्या बैठक होणार आहे.
महाविकास आघाडीत वर्धा, रामटेक, भिवंडी, हिंगोली, जालना, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर मध्ये, मुंबई दक्षिण मध्य, शिर्डी यासह इतर मतदारसंघांचा तिढा अद्याप सुटलेला नाही.
महाविकास आघाडीच्या जाग वाटपात काँग्रेसला २० ते २२ जागा हव्या आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला ६ ते ८ जागा, तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाला १८ ते २० जागा मिळू शकतात.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्यानं वंचित बहुजन आघाडी इंडिया आघाडी किंवा मविआत सहभागी झाल्यास त्यांना काँग्रेसकडून काही जागा सोडाव्या लागू शकतात,
असं नाव न छापण्याच्या अटीवर म्हटलं असल्याचं वृत्त द न्यू इंडियन एक्स्प्रेस या वृत्तपत्राच्या वेबसाइटनं दिलं आहे. शिवसेना ठाकरे गट त्यांच्या कोट्यातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते
राजू शेट्टी यांच्यासाठी जागा सोडण्याची शक्यता आहे. उद्या होणाऱ्या बैठकीत महाविकास आघाडीचं जागावाटप निश्चित होणार का हे पाहावं लागणार आहे.