मनोज जरांगेंचे १० फेब्रुवारीपासून उपोषण ;नेत्यांना दिला इशारा

Manoj Jarange hunger strike from February 10; Leaders warned ​

 

 

 

 

 

मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सोशल मीडियात मराठा आरक्षणविरोधी पोस्ट लिहिणाऱ्यांना कडक शब्दात इशारा दिला आहे. हे लोक कोणत्या पक्षाचे आहेत, कोणत्या नेत्याचे आहेत.. हे आपल्याला माहिती असल्याचंही त्यांनी सांगितलं.

 

 

 

जालन्यातल्या आंतरवाली सराटी इथं सोमवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना ते म्हणाले की, काही राजकीय पक्षाचे लोक सोशल मीडियामध्ये मराठा आरक्षणाबाबत चुकीच्या पोस्ट करत आहेत.

 

 

ते लोक कोणत्या पक्षाचे आहेत आणि कोणत्या नेत्याचे आहेत, हे मी जाहीर करणार आहे. पुढच्या दोन-चार दिवस त्यांना संधी देतो. ते थांबले नाहीत तर नावं जाहीर करणार असल्याचा इशारा जरांगेंनी दिला आहे.

 

 

 

जरांगे पाटील पुढे म्हणाले, मराठ्यांच्या पोरांनी सोशल मीडियात खोटं पसरवणं थांबवलं पाहिजे. सध्या कुणबीच्या ५७ लाख नोंदी सापडलेल्या असून ३९ लाख कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप झालेलं आहे, हे या आंदोलनाचं यश आहे.

 

 

 

ज्यांच्या नोंदी सापडलेल्या आहेत त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी अर्ज करणं गरजेचं आहे. सरकारकडून प्रमाणपत्र देण्याचं काम सुरु आहे. जे मागच्या ७०-७५ वर्षांमध्ये झालं नाही ते आता होत आहे.

 

 

 

 

”सगेसोयऱ्यांच्या बाबतीत सरकारने १५ तारखेला अधिवेशन बोलावलं आहे. त्यानुसार मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळणार आहे. या कायद्याची अमलबजावणी व्हावी, यासाठी १० तारखेपासून मी पुन्हा आमरण उपोषणाला बसणार आहे.

 

 

 

यापूर्वी मी समाजासाठी मरायला तयार होतो, आता मराठा समाजातील जे लोक विरोधात लिहित आहेत त्यांच्यासाठी मरायला तयार आहे.

 

 

 

त्यांनी १० तारखेनंतर अंतरवाली सराटीमध्ये येवून बसावं, अभ्यासकांनीही १० तारखेला इथं यावं, असं आवाहन जरांगे पाटलांनी केलं.”

 

 

माझ्यामागे काही अदृष्य हात आहेत, असा आरोप केला जात आहे. अगोदर शरद पवार यामागे आहेत, असं म्हटलं जायचं. नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं नाव पुढे आलं.

 

 

मागच्या पुण्याईवर मी जगत नाही. तुम्ही इथे येऊन संघर्ष करा, शासनाने काढलेल्या अधिसूचनेशी संबंधित काही सूचना करायच्या असतील तर त्या कराव्यात, विनाकारण चुकीचा मेसेज देऊ नये. माझ्या मागे कुणीही नसल्याचं जरांगेंनी स्पष्ट केलं.

 

 

“हा लढा गरजवंत मराठ्यांचा आहे. ज्यांना गरज नाही, त्यांचा हा लढा नाही. गोरगरीबांना या लढ्यातून बरच काही मिळालं. कारण 70-80 वर्षात जे मिळाल नाही, ते मराठा समाजाला या आंदोलनातून मिळालय.

 

 

आपण कधी काही खोट केलं नाही. करणार पण नाही. मुंबईला जाण्याआधी ट्रॅप रचलेला, पण ते यशस्वी झाले नाहीत. शेवटचा ट्रॅप म्हणजे मुंबईत अडकवायचा का? याचा विचार झाला होता. ते आपल्याला आधी माहिती पडल्यामुळे ते थंड पडले” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

 

 

 

“मी चिकाटीने 24 तास दिवस-रात्र गोरगरीबांसााठी काम करतोय. मी बाजूला झालो पाहिजे, अशी काहीची इच्छा आहे. 70 वर्षात झालं नाही ते आता होतय म्हणून श्रेयवादाची लढाई सुरु आहे.

 

 

काही राजकीय पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते पुढे येत आहेत. मराठा समाजाचे सुद्धा काही जळणारे नेते आहेत” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

 

 

 

“आतापर्यंत या आंदोलनामुळे 57 लाख नोंदी सापडल्या आहेत. 60 लाख गोरगरीब मराठ्यांच कल्याण झालं. मग 75 वर्षात हे का नाही झालं? आता श्रेय घेण्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत.

 

 

39 लाख मराठ्यांना प्रमाणपत्र मिळालय. हे आंदोलनाच यश नाही का? गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांसाठी हे आंदोलन आहे” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

 

 

 

“2000-2001 चा कायदा ओबीसींना आरक्षण देतो. त्यात नव्या व्याख्येचा समावेश करायचा असेल, तर कायदा दुरुस्त करावा लागतो. 2001 चा कायदा ओबीसींना आरक्षण देतो.

 

 

2004, 2006, 2008, 2012 आणि 2014 मध्ये कायद्यात दुरुस्ती 2001 च्या कायद्याच्या आधारावर झालीय. नवीन काही असेल तर शासन निर्णय घ्यावा लागते. सग्या-सोयऱ्यांसाठी शासन निर्णय घेतला असता, तर आरक्षण उडालं असतं” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

 

 

 

“मराठ्यांना ओबीसीत आरक्षण द्यायच आहे. मराठ्यांच्या कुणबी म्हणून नोंदी सापडल्या आहेत, तर दुरुस्ती 2001 च्या कायद्यात झाली पाहिजे, तर त्या कायद्याला चॅलेंज होणार नाही.

 

 

 

आपल चॅलेंज झालं, तर ओबीसींच सगळ आरक्षण उडेल. कारण आपण कुणबी म्हणून ओबीसी आरक्षणात आहोत. आपल उडणार असेल, तर त्यांच सुद्धा 2001 चा कायदा, 1967 चा कायदा आणि 1990 च्या मंडल कायद्यानुसार सगळ उडतय, त्यांचं काही राहत नाही”

 

 

 

असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. “मराठ्यांच्या 54 लाख नोंदी सापडल्या आहे. 54 लाख नोंदी सापडल्यानंतर त्यांच्या परिवारांनी अर्ज करण आवश्य आहे, तुम्ही अर्ज करा प्रमाणपत्र मिळून जातील” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *