अमित देशमुख म्हणाले, नांदेडमध्ये अशोक चव्हाणांना धक्का बसणार?
Amit Deshmukh said Ashok Chavan will be shocked in Nanded?

महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीच्या प्रचारात अशोकाची पतझड आणि वसंत बहार या दोन मुद्द्यांची चर्चा चांगलीच रंगली. अशोक चव्हाण काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेल्यापासून जिल्ह्यात काँग्रेसला गळती लागली.
चव्हाण यांनी काँग्रेसमधील आपल्या समर्थकांची भाजपमध्ये अक्षरशः रांग लावली. पण महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत चव्हाण
यांच्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर झालेल्या सभेत माजी मंत्री लातूर शहरचे काँग्रेस आमदार अमित देशमुख यांनी चव्हाण यांच्यावर मार्मिक टीका केली होती.
अशोकाची म्हणजे अशोक चव्हाण यांच्या भाजपमध्ये जाण्यामुळे त्यांची पडझड सुरू झाली आहे, तर नांदेडात वसंत ऋतूमध्ये नव्या चव्हाणांना बहर आल्याचा टोला अमित देशमुख यांनी लगावला होता.
लातूरचे नांदेडवर यापुढे कायम लक्ष राहील, असे सांगत वसंत चव्हाण यांच्या विजयाचा दावा देशमुख यांनी केला. दरम्यान, महायुतीचे उमेदवार
तथा विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचाराची धुरा नांदेडमध्ये पूर्णपणे अशोक चव्हाण यांच्या खांद्यावर टाकण्यात आली.
मोदींच्या चार सौ पारमध्ये प्रताप चिखलीकरांचा नंबर वरचा असेल, असा दावा चव्हाण प्रचारादरम्यान करताना दिसत आहेत. आता नांदेड लोकसभा मतदारसंघाचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे.
26 एप्रिल रोजी प्रत्यक्ष मतदान होणार असल्याने महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्हीकडच्या उमेदवारांची आणि प्रचार करणाऱ्या नेत्यांची धावपळ वाढली आहे.
नांदेड लोकसभेचा निकाल धक्कादायक लागेल, अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले तरी चिखलीकरांना निवडणूक अवघड जाणार, अशा चर्चांनाही उधाण आलेले आहे.
शक्तिप्रदर्शन आणि प्रचारात दोघांनी आघाडी घेतली. अशोक चव्हाण यांच्यासारखा बडा नेता भाजपसोबत असताना नांदेडात मोदींना सभा का घ्यावी लागली? असा सवाल विरोधकांकडून केला जातोय.
तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत चव्हाण हे कित्येक वर्षे अशोक चव्हाण यांच्यासोबत काम करत असल्याने त्यांची कार्यपद्धती, प्रचार यंत्रणेची माहिती असल्याने ते अशोक चव्हाण यांचे डावपेच उलटवून लावतील,
असे बोलले जाते. त्यामुळे 26 रोजीच्या मतदानानंतर चार जूनला जेव्हा निकाल हाती येईल तेव्हा नांदेडात अशोकाची पतझड होऊन वसंत बहरतो?
हे स्पष्ट होईल. नांदेडमध्ये होणाऱ्या या थेट लढतीकडे आणि त्यानंतरच्या निकालाकडे राज्याचे लक्ष असणार आहे.