पाच उमेदवारांना आचारसंहिताभंगाच्या नोटिसा
Code of conduct violation notices to five candidates
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून सोशल मीडियासह इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये परवानगी न घेताच जाहिराती प्रसिद्ध केल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पाच प्रमुख उमेदवारांना नोटिसा बजावल्या आहेत.
त्यात नाशिकमधून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे, शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे, अपक्ष शांतिगिरी महाराज, सोमेश्वरानंद महाराज यांचा समावेश आहे.
तर, दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार भास्कर भगरे यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. यामुळे उमेदवारांमध्ये खळबळ उडाली असून, खुलाशासाठी धावपळ सुरू झाली आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे राजकीय पक्षांच्या उमेदवारांना प्रचार करायचा असेल तर, त्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून जाहिरातीच्या मजकुराचे प्रमाणिकरण करून घेणे बंधनकारक असते.
सोशल मीडियावरील प्रचार, जाहिरातीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना पहिल्यांदाच निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. त्यासाठी येथील जिल्हा नियोजन समितीच्या इमारतीमध्ये जिल्हास्तरीय मीडिया, संपर्क व्यवस्थापन कक्ष स्थापन केला आहे.
या कक्षातर्फे निवडणूक काळात प्रसारमाध्यमे, इलेक्ट्रॉनिक माध्यम आणि सोशल मीडियातून केल्या जाणाऱ्या जाहिरातीचा सरकारी खर्चाचा परवाना घेतला आहे का, याची पडताळणी रोज केली जात आहे.
निवडणूक रिंगणातील उमेदवारांना स्वत:च्या आणि पक्षाच्या फेसबुक, ट्विटर अकाउंटवरून प्रचारासाठी जाहिरात करताना प्रसिद्धीआधी कक्षाकडे रीतसर अर्ज करून परवाना घेणे बंधनकारक आहे.
नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील अर्ज माघारीची मुदत सोमवारी (दि. ६) संपली. परंतु, उमेदवारी अर्ज माघारीआधीच प्रचाराला जोर आला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन केलेल्या माध्यम कक्षाचा परवाना न घेताच नाशिक आणि दिंडोरीतल्या दिग्गज उमेदवारांनी सोशल मीडियासह इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये प्रचार सुरू केल्यामुळे
जिल्हाधिकारी कार्यालयाने पाच उमेदवारांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्याने खळबळ उडाली आहे. या पाचही जणांना तीन दिवसात
खुलासा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यापुढे जाहिरातीचे प्रमाणिकरण न करता ती प्रसिद्ध केली तर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.