मुख्यमंत्री पदाबाबत काय म्हणाले उद्धव ठाकरे

What did Uddhav Thackeray say about the post of Chief Minister?

 

 

 

सध्या दिल्ली दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरेंनी काल काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. यानंतर त्यांनी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबद्दल सूचक विधान केलं.

 

मुख्यमंत्रिपदाचा चेहरा होण्यास आपण तयार असल्याचे सूचक संकेत त्यांनी दिले. शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेतील.

 

तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर असलेल्या ठाकरेंनी काल काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे महासचिव के. सी. वेणुगोपाल

 

यांच्यासह इंडिया आघाडीच्या प्रतिनिधींची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत राज्यसभेचे खासदार संजय राऊत आणि पुत्र आदित्य ठाकरेदेखील होते.

 

येणारी विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी एकत्रित लढेल आणि जिंकेल असा विश्वास राहुल गांधीनी भेटीनंतर व्यक्त केला.

 

२०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या शरद पवारांचीदेखील उद्धव ठाकरेंनी भेट घेतली.

 

काँग्रेस नेत्यांच्या भेटी आणि शरद पवारांसोबतची बैठक संपल्यावर उद्धव यांनी मुख्यमंत्रिपदाबद्दल सूचक विधान केलं. यावेळी त्यांनी कोविड काळात केलेल्या कामाचा दाखला दिला.

 

‘मी उत्तम काम केलं आहे असं महाविकास आघाडीतील नेत्यांना वाटत असल्यास मी मुख्यमंत्रिपदी असावं अशी त्यांची भावना आहे का हे तुम्ही त्यांनाच विचारा,’

 

असं उद्धव ठाकरेंनी पत्रकारांना सांगितलं. विधानसभा निवडणुकीत मविआचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण, या प्रश्नाला ठाकरेंनी उत्तर दिलं.

 

मला मुख्यमंत्रिपदाची स्वप्नं पडत नाहीत किंवा ते पद मिळावं अशी माझी इच्छादेखील नाही. पण मी जबाबदारी स्वीकारण्यापासून मी पळ काढत नाही.

 

जेव्हा त्या पदाची जबाबदारी मला देण्यात आली, त्यावेळी ती मी स्वीकारली आणि उत्तम काम करण्याचा प्रयत्न केला, याकडे ठाकरेंनी लक्ष वेधलं.

 

 

ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलारांनी सडकून टीका केली. ठाकरे दिल्लीला काँग्रेस नेत्यांची भांडी घासायला गेले आहेत, अशा शेलक्या शब्दांमध्ये शेलार ठाकरेंवर बरसले.

 

‘उद्धव ठाकरे दिल्लीला महिला, शेतकरी किंवा तरुणांच्या समस्यांवर आवाज उठवण्यासाठी गेलेले नाहीत. त्यांना पुन्हा मुख्यमंत्री व्हायचं आहे. त्यासाठी ते काँग्रेसचा पाठिंबा मागायला गेले आहेत,’ अशी टीका शेलारांनी केली.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *