भाजपचा मोठा नेता शरद पवारांच्या गळाला
Big BJP leader Sharad Pawar's neck
भाजपचे नेते तसेच माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे भाजपवर नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार
यांची भेट घेतली आहे. हर्षवर्धन पाटील हे लवकरच शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. कोल्हापूरमध्ये समरजित सिंह घाटगे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा सुरू आहे.
त्याचबरोबर भाजपचे कोल्हापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी देखील अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. अशातच इंदापुरचे हर्षवर्धन पाटील सुद्धा भाजपवर नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
या सगळ्या घडामोडीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली प्रतिकिया दिली आहे. ते म्हणाले की, ” ज्यांना थांबायचे नाही त्यांना कोणी रोखू शकत नाही. हर्षवर्धन पाटील यांनी संयम ठेवला पाहिजे” असं बावनकुळे म्हणाले.
इंदापूरमध्ये सध्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे हे आमदार आहेत. त्यामुळे युती धर्मानुसार ही जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता आहे.
ही गोष्ट लक्षात येताच हर्षवर्धन पाटील यांनी देखील निवडणुकीची तयारी सुरू केली. लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना हर्षवर्धन पाटील यांनी मदत केली होती.
त्याचबरोबर इंदापूर विधानसभेची जागा हर्षवर्धन पाटील यांना दिली जाईल असा शब्द देण्यात आला होता. परंतु आता हर्षवर्धन पाटील
हे तिकीटावरून नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे आता हर्षवर्धन पाटील आगामी काळात काय भूमिका घेतात? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिक्कल राहिले आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून त्याबाबतची चाचपणी सुरू झाली आहे.
महायुती लोकसभेत झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी तर महाविकास आघाडी लोकसभेसारखी कामगिरी करण्यासाठी तयार आहे.