मोदी-शहांचे टेन्शन वाढणार ? भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी पॉवरफुल नेत्याचे नाव आघाडीवर
Modi-Shah tension will increase? A powerful leader's name is in the forefront for the post of BJP national president
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा कार्यकाळ दोन वर्षांसाठी वाढवण्यात आला होता. अशातच आता जे.पी. नड्डा यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधी पुन्हा एकदा भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या चर्चेला उधाण आले आहे.
या पदासाठी तीन नेत्यांची नावे शर्यतीत आहेत. त्यात राजस्थानच्या दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या वसुंधरा राजे यांचे नाव आघाडीवर आहे.
या वसुंधरा राजे यांच्या नावाची एवढी चर्चा सुरू झाली आहे की, सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांनी त्यांचे अभिनंदन करायला सुरुवात केली आहे.
अध्यक्षपदासाठी वसुंधरा राजे यांच्याशिवाय मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि संजय जोशी यांचीही नावे चर्चेत आहेत.
या नावांमध्ये वसुंधरा राजे यांच्या नावाला आरएसएस प्राधान्य देत असल्याचे काही राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हे खरे असेल तर वसुंधरा यांना भाजप अध्यक्ष होणे सोपे जाणार आहे.
मात्र, धक्कादायक निर्णय घेणारा पक्ष राष्ट्रीय अध्यक्ष कोणाला करेल? याबाबत आत्ताच काही निश्चितपणे सांगता येणार नाही. पीएम मोदी आणि अमित शहा यांच्या मनात कोण आहे? हे नाव जाहीर झाल्यानंतरच कळेल.
भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी वसुंधरा राजे यांचे नाव आघाडीवर आहे. यामागे वसुंधरा यांची आरएसएसवर असलेली मजबूत पकड असल्याचे सांगितले जात आहे.
आरएसएसनेच वसुंधरा राजे यांचे नाव पुढे केले असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र, अमित शहांसह पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते त्यांच्या नावावर सहमत नाहीत.
पंतप्रधान मोदी आणि संजय जोशी यांच्यातील आकडा 36 चा होता. 2012 मध्ये नरेंद्र मोदी यूपी विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी गेले नव्हते.
कारण संजय जोशी तिथे समन्वयक होते, यावरून त्यांच्यातील संबंध कसे आहेत. याचा अंदाज येतो. अशा स्थितीत वसुंधरा राजेच आघाडीवर असल्याचे दिसत आहे.
यानंतर आणखी एक नाव उरले आहे, ते म्हणजे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि सध्या केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे,
त्यांची स्वच्छ प्रतिमा आणि आरएसएसशी चांगली जवळीक आहे. अमित शहा आणि पंतप्रधान मोदींसोबतही त्यांचे संबंध चांगले आहेत.
दरम्यान, वसुंधरा यांची लोकप्रियता अजूनही कायम आहे. वसुंधरा राजे सध्या पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा आहेत. पण गेल्या विधानसभा निवडणुकीत राजे यांनी निवडणुकीच्या मुख्य प्रवाहापासून स्वतःला थोडे वेगळे केले होते.
राजस्थान व्यतिरिक्त त्या देशातील भाजपचाही मोठा चेहरा आहेत. राजेंची लोकप्रियता आजही कायम आहे. त्यामुळे अध्यक्षपदासाठी त्यांचीच वर्णी लागू शकते अशी चर्चा सुरू आहे.