अमित शाह सुनील तटकरेंच्या घरी जेवायला जाणार, आता ED आणि CBI बंद करून टाका
Amit Shah will go to Sunil Tatkare's house for dinner, now shut down ED and CBI

सिंचन घोटाळ्यात तत्कालिन मंत्री सुनिल तटकरे यांचा सहभाग असून त्यांना भ्रष्टाचाराचा हिशेब द्यावाच लागेल, असे सांगत ‘विसरला नाही महाराष्ट्र’ असा हॅशटॅग चालविणाऱ्याने भाजपने राष्ट्रवादीशी जुळवून घेतले आहे.
महाराष्ट्र दौऱ्यावर येणारे गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी सुनिल तटकरे यांच्या घरचे भोजनाचे निमंत्रण स्वीकारले आहे. अमित शाह यांचे तटकरेंचे घरी भोजनास जाणे,
हे राजकीयदृष्ट्या कोकणात शक्तिशाली असलेल्या शिंदेसेनेला मोठा शह मानला जातोय. मात्र एकेकाळी भाजपनेच ‘भ्रष्टाचाराचे शिरोमणी’ असा उल्लेख केलेल्या तटकरे यांच्या घरच्या जेवणाचे निमंत्रण अमित शाह यांनी स्वीकारल्याने सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया संतापल्या आहेत.
अमित शाह हे ११ आणि १२ एप्रिलला महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. रायगड किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्याकरिता अमित शाह ११ तारखेला जाणार आहेत. त्यानंतर रायगड किल्ल्यावरील विविध कार्यक्रमांना हजेरी लावून दुपारच्या वेळी ते सुनिल तटकरे यांच्या घरी भोजन करतील.
कितीही मोठा घोटाळा करा, काही प्रॉब्लेम नाही. ७२ हजार कोटींचा सिंचन घोटाळा आठवतो का? त्याचे पुढे काय झाले? काहीच नाही ना ? कारण आपलं थर्ड क्लास राजकारण. घोटाळ्याची चौकशी कधीच करायची नव्हती.
फक्त धमकी देऊन, महाराष्ट्रात सत्ता आणायची होती. आता त्याच तटकरेंच्या घरी गृहमंत्री जेवायला जाणार ? अतिउत्तम ! ED आणि ACB आता गुंडाळून टाका… अशा शब्दात दमानिया यांनी त्यांचा संताप व्यक्त केला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या निवासस्थानी भोजनास जाणार आहेत. अमित शहा हे महाराष्ट्र दौऱ्यावर असताना रायगड सुतारवाडी इथे सुनिल तटकरे यांच्या निवास स्थानी जाणार आहेत.
दुपारी २.१५ ते ३ वाजेची वेळ ही तटकरे कुटुंबियांच्या निवासस्थानी राखीव ठेवण्यात आली आहे. त्यामुळे सुनिल तटकरे यांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारल्याची चर्चा राजकिय वर्तुळात रंगली आहे.