भाजपला मोठा धक्का;मंत्र्याच्या भावाने दिला भाजपचा राजीनामा
Big blow to BJP; Minister's brother resigned from BJP

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच नंदुरबारमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे बंधू
भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रकुमार गावित आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव कोणत्याही परिस्थितीत शहादा-तळोदा मतदारसंघातून निवडणूक लढवणारच, अशी घोषणा भाजप नेते राजेंद्रकुमार गावित यांनी केली होती. त्यानंतर आता राजेंद्रकुमार गावित यांनी राजीनामा दिला आहे.
राजेंद्रकुमार गावित हे शहादा-तळोदा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे.
त्यामुळे आता राजेंद्रकुमार गावित नेमकं कुठल्या पक्षात जाणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. राजेंद्रकुमार गावित निवडणूक लढणार असल्यामुळे
आमदार राजेश पाडवी यांची डोकेदुखी वाढली आहे. तर निवडणुकीच्या तोंडावर राजेंद्रकुमार गावित यांनी पक्षाच्या राजीनामा दिल्याने भाजपाला मोठं खिंडार पडलं आहे.
तर शहादा तळोदा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हा परिषद सदस्य मोहन शेवाळे यांनीही उमेदवारीसाठी रणशिंग फुंकले आहे.
मोहन शेवाळे यांनी तळोदा तालुक्यातील कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा घेत संवाद यात्रा सुरु केली असून ते संपूर्ण मतदारसंघात मतदार
आणि कार्यकर्त्यांसमोर जात आहेत. यावेळी अब की बार स्थानिक आमदार, अशी घोषणा त्यांनी दिली आहे. त्यामुळे महायुतीमधील नाराजीनाट्य समोर आले असून नंदुरबारमधील राजकीय वातावरण तापल्याचे दिसून येत आहे.
राजेंद्रकुमार गावित हे देवमोगरा एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष असून राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे बंधू आहेत.
यापूर्वी लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी मुलाखत दिली होती. 2014 मध्ये त्यांनी शहादा-तळोदा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे निवडणूक लढवली होती.
त्यावेळी त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. पुढे 2019 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, त्यांना निवडणुकीचे तिकीट नाकारण्यात आले.
आता आगामी विधानसभेची निवडणूक आपण लढवणारच असं गावित यांनी स्पष्ट करत भाजपचा राजीनामा दिला आहे.