विदर्भात ४९ आजी, ३४ माजी आमदार रिंगणात
In Vidarbha, 49 grandmothers, 34 former MLAs are in the fray

विदर्भातील ६२ विधानसभा मतदारसंघांत विधानसभेचे ४६ तर विधानपरिषदेचे तीन सदस्य असे एकूण ४९ विद्यमान आमदार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
तर ३४ माजी आमदार पुन्हा मैदानात उतरून आपले नशीब आजमावत आहेत. तब्बल २० मतदारसंघांत आजी विरुद्ध माजी आमदार असा सामना आहे.
विदर्भातील नऊ विद्यमान आमदारांना त्यांच्या पक्षांकडून उमेदवारी मिळाली नाही. काही आजी-माजी आमदारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
नंतर पक्षांकडून समजूत काढल्यानंतर माघार घेतली. तर दहा मतदारसंघांत माजी आमदारांची बंडखोरी कायम आहे. सात मतदारसंघांत एकही आजी-माजी आमदार लढत नसल्याने याठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी आहे.
नागपूर जिल्ह्यातील नऊ विद्यमान आमदार पुन्हा निवडणुकीच्या मैदानात आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (नागपूर दक्षिण-पश्चिम), कृष्णा खोपडे ( नागपूर पूर्व), मोहन मते (नागपूर दक्षिण), समीर मेघे (हिंगणा)
हे विधानसभेचे तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (कामठी), प्रवीण दटके (नागपूर मध्य) हे विधान परिषदेचे विद्यमान आमदार लढत देत आहेत.
काँग्रेसचे डॉ. नितीन राऊत (नागपूर उत्तर), विकास ठाकरे (नागपूर पश्चिम) आणि शिवसेनेचे आशिष जयस्वाल (रामटेक) निवडणूक रिंगणात आहेत.
सुधाकर कोहळे (नागपूर पश्चिम), डॉ. मिलिंद माने (नागपूर उत्तर), आशिष देशमुख (सावनेर), सुधीर पारवे (उमरेड), राजेंद्र मुळक (रामटेक), रमेश बंग (हिंगणा) हे माजी आमदारही निवडणूक लढत आहेत.
भंडारा जिल्ह्यात नरेंद्र भोंडेकर (भंडारा), राजू कारेमोरे (तुमसर), काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( साकोली) हे विद्यमान आमदार आणि चरण वाघमारे (तुमसर), सेवक वाघाये (तुमसर)
हे माजी आमदार रिंगणात आहेत. गोंदिया जिल्ह्यात विद्यमान आमदार विनोद अग्रवाल ( गोंदिया), विजय रहांगडाले ( तिरोडा) पुन्हा मैदानात आहेत.
गोपालदास अग्रवाल (गोंदिया), संजय पुराम( आमगाव), राजकुमार बडोले (अर्जुनी मोरगाव), दिलीप बन्सोड( अर्जुनी मोरगाव) हे माजी आमदार निवडणूक लढत आहेत.
गडचिरोली जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम (अहेरी), कृष्णा गजबे (आरमोरी) हे विद्यमान आमदार पुन्हा मैदानात आहेत.
तर अंबरीश आत्राम (अहेरी), आनंदराव गेडाम (आरमोरी) हे माजी आमदार निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (बल्लारपूर),
विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (ब्रह्मपुरी), किशोर जोरगेवार (चंद्रपूर), सुभाष धोटे (राजुरा), बंटी भांगडिया (चिमूर) हे विद्यमान आमदार निवडणूक लढत आहेत. तर शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते अॅड. वामनराव चटप (राजुरा) हे माजी आमदार मैदानात आहे.
वर्धा जिल्ह्यातील पंकज भोयर (वर्धा), रणजित कांबळे (देवळी), समीर कुणावार (हिंगणघाट) हे तीन विद्यमान आमदार यावेळीही निवडणुकीच्या मैदानात कायम आहेत.
तर राजू तिमांडे (हिंगणघाट) हे माजी आमदार निवडणूक लढत आहे. यवतमाळ जिल्ह्यात मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड ( दिग्रस), मदन येरावार (यवतमाळ), संजीवरेड्डी बोदकुरवार (वणी),
अशोक उईके (राळेगाव), इंद्रनील नाईक (पुसद) हे विद्यमान आमदार रिंगणात आहेत. तर प्रा. वसंत पुरके (राळेगाव), माणिकराव ठाकरे (दिग्रस), राजू तोडसाम (आर्णी), राजेंद्र नजरधने (उमरखेड), विजय खडसे (उमरखेड) हे माजी आमदार पुन्हा मैदानात उतरले आहेत.
अमरावती जिल्ह्यात सुलभा खोडके (अमरावती), रवी राणा (बडनेरा), यशोमती ठाकूर (तिवसा), बच्चू कडू (अचलपूर), राजकुमार पटेल (मेळघाट), देवेंद्र भुयार (मोर्शी), प्रताप अडसड (धामणगाव रेल्वे)
हे विद्यमान आमदार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर सुनील देशमुख (अमरावती), जगदीश गुप्ता (अमरावती), अभिजित अडसूळ (दर्यापूर), रमेश बुंदिले (दर्यापूर), केवलराम काळे (मेळघाट), वीरेंद्र जगताप (धामणगाव रेल्वे) हे माजी आमदार पुन्हा निवडणूक लढवित आहेत.
अकोला जिल्ह्यात रणधीर सावरकर( अकोला पूर्व), प्रकाश भारसाकळे (अकोट), नितीन देशमुख ( बाळापूर),हरीश पिंपळे (मूर्तिजापूर) हे विद्यमान आमदार मैदानात असून बळीराम शिरसकर (बाळापूर), नातिकोद्दीन खतीब (बाळापूर) हे माजी आमदार लढत आहेत. बुलढाणा जिल्ह्यात संजय गायकवाड (बुलढाणा),
राजेश एकडे ( मलकापूर), श्वेता महाले (चिखली), डॉ. राजेंद्र शिंगणे (सिंदखेडराजा), संजय रायमूलकर (मेहकर), आकाश फुंडकर (खामगाव), संजय कुटे (जळगाव-जामोद) हे विद्यमान आमदार निवडणूक लढत आहेत. तर माजी आमदार चैनसुख संचेती (मलकापूर), राहुल बोंद्रे (चिखली),
डॉ. शशिकांत खेडेकर (सिंदखेडराजा), दिलीपकुमार सानंदा (खामगाव) हे पुन्हा मैदानात उतरले आहेत. वाशीम जिल्ह्यातील अमित झनक (रिसोड) हे विधानसभेचे तर भावना गवळी ( रिसोड) या विधान परिषदेच्या विद्यमान आमदार मैदानात आहेत. तर माजी आमदार अनंतराव देशमुख (रिसोड)हे पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.
पक्षाकडून उमेदवार न मिळाल्याने रामटेकमधून राजेंद्र मुळक, तुमसरमधून सेवक वाघाये, अहेरीतून अंबरीश आत्राम, आरमोरीमधून आनंदराव गेडाम, हिंगणघाटमधून राजू तिमांडे, उमरखेडमधून राजेंद्र नजरधने, विजय खडसे, अमरावतीतून जगदीश गुप्ता, दर्यापूरमधून रमेश बुंदिले,
रिसोडमधून अनंतराव देशमुख हे माजी आमदार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या माजी आमदारांच्या उमेदवारीमुळे महायुती आणि महाविकास आघाडीतील अधिकृत उमेदवारांच्या अडचणी वाढणार आहे.
विदर्भातील नागपूर पश्चिम, नागपूर उत्तर, रामटेक, हिंगणा, तुमसर, गोंदिया, अहेरी, आरमोरी, हिंगणघाट, राळेगाव, दिग्रस, अमरावती, मेळघाट, धामणगाव रेल्वे, बाळापूर, मलकापूर, चिखली,
सिंदखेडराजा, खामगाव, रिसोड या २० मतदारसंघांमध्ये आजी विरुद्ध माजी आमदार आमने-सामने लढत आहेत. या मतदारसंघांतील लढती रंगतदार ठरतील. तर अर्जुनी-मोरगाव आणि उमरखेड या दोन मतदारसंघांत माजी आमदार एकमेकांच्या विरोधात उभे आहेत.
विदर्भातील काटोल, गडचिरोली, वरोरा, आर्वी, अकोला पश्चिम, वाशीम, कारंजा या सात मतदारसंघांत आजी-माजी आमदार लढतीत नाहीत. काही उमेदवार यापूर्वी विधानसभा निवडणूक लढलेले आहेत. पण त्यांना यश मिळाले नाही. तर काही उमेदवार नवखे आहेत. ते पहिल्यांदा निवडणूक लढत आहेत.
त्यामुळे या मतदारसंघांतील लढती लक्षवेधी ठरणार आहेत. या मतदारसंघांतून विजयी होणारा उमेदवार पहिल्यांदा आमदार होईल. त्यामुळे या सात ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहेत.