आमच्या अंतर्गत प्रश्नात डोनाल्ड ट्रम्प यांचा संबंध काय? शिवसेनेचा सवाल
What is Donald Trump's connection to our internal issues? Shiv Sena's question

भारत आणि पाकिस्तान यांच्यात गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेला तणाव आता निवळला आहे. दोन्ही देशांत सध्या शस्त्रसंधी झाली असून आगामी काळातलं युद्ध टळलं आहे.
अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर आता दोन्ही देशांनी एक-एक पाऊल मागे घेतलं आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्यानंतर भारत-पाकिस्तानात शस्त्रसंधी लागू करण्यात आली आहे. आता यावरुन खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे.
खासदार संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली. यात डोनाल्ड ट्रम्प यांचा संबंध काय? आमची माणसे मेली आहेत,
आमच्या २६ महिलांचा सिंदूर पुसला आहे. मग ऑपरेशन सिंदूर पूर्ण झाल्याशिवाय ट्रम्प हे कोणत्या अधिकाराने मध्यस्थी करत आहेत, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केली, असं सांगण्यात येतंय हे चुकीचं आहे. तुम्ही जर व्हाईट हाऊसचे निवेदन पाहिलं किंवा ट्रम्प यांचं ट्वीटर अकाऊंट पाहाल तर ट्रम्प यांच्या विनंतीवरुन भारताने युद्धबंदी स्वीकारली. डोनाल्ड ट्रम्प यांचा संबंध काय,
आमची माणसे मेली आहेत, आमच्या २६ महिलांचा सिंदूर पुसला आहे. मग ऑपरेशन सिंदूर पूर्ण झाल्याशिवाय ट्रम्प हे कोणत्या अधिकाराने मध्यस्थी करत आहेत, असा सवाल संजय राऊतांनी केला.
“भारत हा एक सार्वभौम राष्ट्र आहे. एक स्वतंत्र राष्ट्र आहे. १४० कोटी लोकसंख्येचे राष्ट्र आहे. ट्रम्प सांगतात म्हणून आम्ही युद्धबंदी करु, कोणत्या आधारावर कोणत्या अटी शर्तींवर भारताला काय मिळालं आहे.
युक्रेन आणि रशियाच्या युद्धानंतर भाजपने जाहिरात केली होती. पप्पांनी युद्ध थांबवलं म्हणजेच मोदींनी युद्ध थांबवलं असं म्हटलं जात होतं. मग आता अमेरिकेच्या पपांनी युद्ध थांबवलं का? पुरा बदला लेंगे, छोडेंगे नही अशी यांची भाषा होती.
पाकिस्तानचे तुकडे करु, कुठे गेले तुकडे, भारताची बेअब्रू झाली आहे. पाकिस्तान मूर्ख देश आहे. जगभरात पाकिस्तानच्या पंतप्रधानानंचे विधान आहे की आम्ही युद्ध जिंकलं आहे.
भारतासारख्या देशाला आणि पंतप्रधानाला हे शोभत नाही. कोणत्या अटी शर्थींवर युद्धबंदी केली यासाठी सर्वपक्षीय बैठक व्हायला हवं. या बैठकीसाठी पंतप्रधान मोदींनी उपस्थितीत राहायला हवे. पंतप्रधान मोदींना पळ काढता येणार नाही”, अशी मागणीही संजय राऊतांनी केली.
“युद्धबंदीची गरज होत, लाहौर, कराची, इस्लामाबाद हे ताब्यात आले. ही वेळ पाकिस्तानला कायमस्वरुपी धडा शिकवण्याची संधी होती. भारतीये सेनेचे मनोबल प्रचंड उचावलेले होते.
पण अचानक देशाच्या राजकीय नेतृत्वाने कच खाल्ली आणि आमच्या देशाचे आणि सैन्याचे मनोबल त्यांनी उद्ध्वस्त केले. हे डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी… त्यांचा यात संबंध काय? एका सार्वभौम राष्ट्राच्या निर्णयात हस्तक्षेप करण्याचा ट्रम्प यांना अधिकार काय?
जे मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना 26/11 हल्ल्यानंतर जेव्हा आपण बराक ओबामा यांच्याशी चर्चा केली. तेव्हा हेच मोदी सांगत होते की ओबामाकडे जाऊन रडत आहेत आणि आता मोदी काय ट्रम्पकडे जाऊन रडतात का ज्या महिलांचा सिंदूर पुसला गेला.
त्यांच्या त्यागाचा केलेला हा एक अपमान आहे. सिंदूर वैगरे हे सर्व राजकारण खोटं आहे. काही माघार घेण्याची गरज नव्हती. जेव्हा आपण एका टोकाला पोहोचलो आहोत,
तेव्हा अशाप्रकारे अवसान घात करणं हे कोणाच्या तरी दबावाखाली कोणाला तरी फायदा पोहोचावं यासाठी ही युद्धबंदी जाहीर केली”, असा घणाघात संजय राऊतांनी केला.