बीडमध्ये झालेली दगडफेक आणि जाळपोळीबद्दल पंकजा मुंडे यांच्या विधानाने खळबळ
Pankaja Munde's statement on stone pelting and arson in Beed stirs up excitement
बीडमध्ये झालेल्या दगडफेक आणि जाळपोळीमुळे जे काही नुकसान झाला आहे या नुकसानीची पाहणी पंकजा मुंडे यांनी आज केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना बीडमध्ये जी घटना घडली.
ही घटना म्हणजे इंटेलिजन्स ब्युरो म्हणजेच पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेचे अपयश असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले. त्यामुळे सराटी अंतरवाली येथे झालेला लाठीचार्ज असो की बीडमध्ये झालेली दगडफेक आणि जाळपोळ असो या दोन्हींची देखील एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
विरोधकांकडून गृह खात्याच्या कारभारावर टीका सुरू असताना आता पंकजा मुंडे यांंनी गुप्तचर यंत्रणेच्या अपयशावर बोट ठेवल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
30 तारखेला बीडमध्ये जेव्हा दगडफेक आणि जाळपोळ सुरू होते. त्यावेळी दगडफेक करणारे जे तरुण होते त्यांना वाचवण्यासाठी ॲम्बुलन्स आणि इतर काही गोष्टी देखील त्यांना तात्काळ मिळत होत्या.
ही माहिती पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेला नव्हती का असा प्रश्न देखील पंकजा मुंडे यांनी उपस्थित केला. इंटेलिजन्स फेल असल्यामुळे हा प्रकार बीडमध्ये घडला असल्याचं त्या म्हणाल्या आहेत.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून बीडमध्ये दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली होती. यामध्ये मोठ्या प्रमाणात सार्वजनिक आणि वैयक्तिक मालमत्तेचे नुकसान झालं होतं.
याचीच पाहणी करण्यासाठी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आज बीडमध्ये आल्या होत्या. त्यांनी आमदार संदीप क्षीरसागर, माजी आमदार अमरसिंह पंडित त्याचबरोबर भाजप कार्यालयासह सुभाष राऊत यांच्या ‘सनराइज हॉटेल’ला देखील भेट दिली.
जाळपोळ आणि दगडफेकीमध्ये जे काही नुकसान झाले आहे. ते पाहिल्यानंतर पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये बोलताना त्यांनी म्हटले की, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी फक्त शब्द आणि मुदत देण्यापेक्षा खरीखुरी चर्चा व्हायला हवी. आमचा देखील मराठा समाजाला पाठिंबा आहे.
मात्र, 30 तारखेला बीडमध्ये जी घटना घडली. ती अप्रिय घटना आहे. त्यामुळे आपल्या मागणीसाठी जर प्रत्येक जण रस्त्यावर उतरायला लागला तर परिस्थिती अवघड होईल असं देखील पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.
आपल्या मागणीसाठी कोणीही आंदोलन करत असेल तर ते योग्य मार्गाने असले पाहिजे आंदोलनामध्ये जर दहशत वाजवण्याचा प्रकार होऊ नये, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.