पोलीस उपायुक्तांच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या ;मराठवाड्यातील घटना
Deputy Commissioner of Police's son commits suicide by hanging; incident in Marathwada
बेडरुममधील आरशावर स्केच पेनने आय वॉन्ट टू रिस्टार्ट, आय ऍम नॉट क्विटिंग, लव यू बोथ असं लिहीत पोलीस उपायुक्तच्या मुलाने बाथरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.
शहरामध्ये कार्यरत असलेले शीलवंत नांदेडकर यांच्या मुलाने आत्महत्या केल्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. रविवारी १३ ऑक्टोबर रोजी ही घटना घडली.
साहिल शीलवंत नांदेडकर, वय १७ असं गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपायुक्त मुख्यालय प्रशासन शीलवंत नांदेडकर
यांचा साहिल हा एकुलता एक मुलगा होता. साहिल हा बारावीच्या विज्ञान शाखेमध्ये शिक्षण घेत होता. त्याला भविष्यात आयआयटीमध्ये शिक्षण घ्यायचं होतं.
तीन विषयांसाठी त्याने तीन वेगवेगळ्या खाजगी क्लासेसमध्ये क्लासेस लावले होते. तीनही क्लासेसमध्ये तो टॉपर होता. १७ वर्षीय साहिल अभ्यासात हुशार होता.
दरम्यान शनिवारी साहिलने आई-वडिलांसोबत जेवण केलं. त्यानंतर रात्री बारापर्यंत आई-वडिलांसोबत त्याने गप्पाही मारल्या. नंतर झोपण्यासाठी तो स्वतःच्या खोलीत गेला.
सकाळी सहा वाजेच्या सुमारास वडील शीलवंत नांदेडकर मॉर्निंग वॉकसाठी उठले. फ्रेश होण्यासाठी बाथरुममध्ये गेल्यानंतर साहिल हा गळफास घेतलेला अवस्थेत आढळून आला.
त्यांनी तातडीने साहिलला घाटी रुग्णालयात दाखल केलं. मात्र रुग्णालयात डॉक्टरांनी साहिलला तपासून मृत्यू घोषित केलं. याप्रकरणी वेदांत नगर पोलीस ठाण्यामध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.
आदल्या रात्री झोपण्याआधी तो आई-वडिलांसोबत गप्पा मारत होता. सगळं काही सुरळित असताना त्याने अचानक इतक्या टोकाचं पाऊल का उचललं या मागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
साहिलच्या अशा जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत असून आई-वडिलांचा एकुलता एक लेक गेल्याने त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.