मोदी-शहा यांच्यासमोर गडकरीं पडले एकाकी !
Gadkari stood alone in front of Modi-Shah

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा यवतमाळ दौरा होऊन आठवडाही उलटत नाही तोच केंद्रीय मंत्री अमित शाह मंगळवारी (ता.5) अकोला दौऱ्यावर आले. मोदी- शाह यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ‘400 पार’चा नारा दिल्यानंतर
भाजपची पहिली यादीही जाहीर केली आहे, पण या यादीत महाराष्ट्रातील एकाही नेत्याची उमेदवाराला स्थान देण्यात आले नाही.
लोकसभेसाठी महाराष्ट्रावर विशेष लक्ष दिलेल्या मोदी-शाह यांनी पहिल्या यादीत विद्यमान केंद्रीय मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते नितीन गडकरींची तरी उमेदवारी जाहीर करतील अशी अपेक्षा भाजप कार्यकर्त्यांना होती.
पण ते न झाल्यामुळे एकीकडे राजकारण तापलं असतानाच आता नितीन गडकरींना बाजूला ठेवत मोदी – शाह यांनी विदर्भ आणि महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना बाजूला ठेवत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा विदर्भ व महाराष्ट्र दौरा सुरू आहे.
विदर्भातील काही मतदारसंघांचे उमेदवार ठरविण्याचे यशस्वी कार्य यापूर्वी नितीन गडकरी यांनी केले. काहींना केंद्रात मंत्री पद दिले. पण, आज त्याच गडकरींशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचा दौरा होताना दिसून येत आहे.
विदर्भातील, महाराष्ट्रातील ज्या नेत्यांना गडकरींनी मोठे केले तेदेखील स्वागताच्या बॅनरवर नितीन गडकरी यांचा साधा फोटो लावण्यासदेखील भितात हेही यानिमित्त पाहण्यात आले.
गडकरींनी विदर्भात, महाराष्ट्रात कोट्यवधींचे विकासकामे, रस्ते निर्माण कार्यात अनेक लोकसभा मतदारसंघात मोलाचा वाटा उचलला असताना गडकरींना भाजप का टाळत आहे,
असा प्रश्न कर्मठ भाजप कार्यकर्त्यांना पडला आहे. केवळ भाजपच्या कार्यकर्त्यांना असा प्रश्न पडला नाही तर संघ परिवारातदेखील याविषयी नाराजीचा सूर आहे.
नितीन गडकरी सांगतील तो उमेदवार यापूर्वी लोकसभेत उभा केला जात असे, आता मात्र थेट या प्रक्रियेतून गडकरींना बाजूला ठेवण्यात येत आहे असे चित्र निर्माण होत आहे.
भाजपच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षांना केंद्रीय निवडणूक समितीमध्येदेखील घेण्यात आले नाही. भाजपच्या पहिल्या उमेदवार यादीत नितीन गडकरींचे नाव वगळण्यात आल्याचीदेखील राज्यात नाही देशात चर्चा आहे.
यात अमित शाह यांनी थेट विदर्भातील सहा लोकसभा मतदारसंघांचा आज गोपनीय आढावा घेतला. यात आढावा बैठकीत गडकरींना वगळल्याची चर्चा मात्र होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळचा दौरा केला. त्यावेळी पंतप्रधान नागपूर विमानतळावर उतरले. तिथे नितीन गडकरी यांनी त्यांचे स्वागत केले.
काल-परवा मोदींनी तेलंगणात जाण्यापूर्वी नागपूर विमानतळावर निवडक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसोबत चंद्रशेखर बावनकुळे व गडकरींसोबत चर्चा केली.
त्यानंतर आता थेट अमित शाह यांनी विदर्भातील सहा जागांवर चर्चा करण्यासाठी अकोल्याचा दौरा केला. त्या सहापैकी केवळ तीन जागा भाजपच्या ताब्यात आहेत.
दोन जागांवर शिवसेनेचा ताबा आहे, तर एका जागेवर अपक्ष नवनीत राणा यांचा दावा आहे, असे असताना या जागांविषयी भाजपचे
राष्ट्रीय पदाधिकारी अमित शाह यांनी चर्चा केल्यानंतर या जागा शिवसेनेकडून खेचण्याचा थेट प्रयत्न तर होत नाही ना, असा प्रश्न निर्माण होतो.
यातून अमित शाह थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला शह तर देत नाही ना, अशी भावना शिवसेनेमध्ये निर्माण झाली आहे.
बुलढाणा या लोकसभा मतदारसंघात शिवसेना (शिंदे गट) खासदार प्रतापराव जाधव यांच्याकडे आहे. त्याच बरोबर यवतमाळ – वाशीम लोकसभा मतदारसंघात खासदार भावना गवळी या शिंदे सेनेच्या नेत्या यांच्याकडे हा मतदारसंघ आहे.
अपक्ष खासदार नवनीत राणा यांच्या ताब्यात अमरावती लोकसभा मतदारसंघ आहे. असे असताना मित्र पक्षाच्या जागांवरदेखील अमित शाह यांनी आजच्या दौऱ्यात चर्चा केली.
इतकेच नाही तर भावना गवळी यांच्या मतदारसंघात तर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांची जाहीर सभा घेत रणशिंग फुंकले होते.
असे असताना ‘मित्रपक्षां’च्या जागांवर तर भाजप दावा करत नाही ना असा संशय आजच्या बैठकीतून दिसून आला. त्यामुळे
बुलढाणा आणि यवतमाळ-वाशीम या लोकसभा मतदारसंघावर शिवसेना पाणी सोडणार का, असा प्रश्न यानिमित्त उपस्थित होत आहे.
एकंदरच विदर्भात शेतकरी आत्महत्यांचे न थांबलेले सत्र आणि कापूस तसेच सोयाबीनला न मिळालेला भाव हा लोकसभा निवडणुकीतील चर्चेचा मुद्दा न राहता भाजप शिवसेनेच्या जागांवर ताब्यात घेणार काय, असा प्रश्न जनतेसमोर आला आहे.
अमित शाह यांच्या बैठकीला मित्र पक्षांच्या आमदार, खासदारांनादेखील निमंत्रित केले नव्हते. त्यामुळे भाजप एकतर्फी निर्णय घेत या जागांवर दावा तर करणार नाही, अशी धाकधूक शिवसेनेच्या नेत्यांमध्ये निर्माण झाली आहे.
2019 च्या निवडणुकीत काँग्रेसने जिंकलेल्या चंद्रपूर या एकमेव जागेवरदेखील अमित शाह यांच्या दौऱ्यात चर्चा करण्यात आली. या ठिकाणी हंसराज अहिर किंवा सुधीर मुनगंटीवार यांच्या पैकी एकाला तिकीट भाजप देऊ शकते.
वर्धा हा परंपरागत मतदारसंघ भाजपकडे आहे. खासदार रामदास तडस यांना या वेळी तिकीट मिळते की नाही, असा संशय व्यक्त केल जात आहे. पण, त्यांचे तिकीट पक्के असल्याचे भाजपच्या दुसऱ्या गोटातून सांगितले जात आहे.
अकोल्यात घराणेशाहीला नकार दिला जातो का हेदेखील पाहण्यासारखे ठरेल. एकूण आजच्या दौऱ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची
छाप दिसून आली, तर त्यांच्या सोबतीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची केवळ उपस्थिती होती.
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता फोडून भाजपने पहिले शिवसेनेला गळास लावले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला फोडले.
अशा परिस्थितीत महाराष्ट्रात लोकसभा निवडणुका होत आहेत. त्यात अद्याप राज्यातील महाविकास आघाडीच्या जागावाटपांची स्थिती अनिश्चित आहे.
वंचित महाविकास आघाडीच्या सोबत की बाहेर असा प्रश्न कायम आहे, असे असताना महाराष्ट्रातील एकही मतदारसंघात भाजपने उमेदवार घोषित केला नाही.
महाराष्ट्रातील 48 पैकी 45 जागांवर भाजप विजयी होणार, असा दावा करत असताना भाजपच्या दिग्गज नेत्यांना महाराष्ट्रात दौरा करावा लागत आहे.
त्यामुळे केंद्रातील भाजप नेतृत्वाचा महाराष्ट्रातील मराठी नेतृत्वावरचा विश्वास ढासळला काय ? असा प्रश्न यानिमित्त चर्चेत आहे.
लोकसभा निवडणुकीचे सगळे निर्णय घेताना महाराष्ट्रातील नेत्यांना विचारात घेतले जात आहे, की नाही असा संशय निर्माण होत आहे.