आता कोण रक्षा करणार ? पोलिसांनीच केले तब्बल २५ तोळे सोने लंपास

Who will protect me now? The police themselves looted 25 tolas of gold.

 

 

 

पुण्यातील वानवडी पोलिसांनी एका सराफा व्यावसायिकाला लुटल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित सराफा व्यावसायिकाने कोयता गँगकडून सोनं खरेदी केल्याचा आरोप लावून आरोपी पोलिसांनी व्यावसायिकाकडून तब्बल २५ तोळे सोने गायब केले.

 

या प्रकरणी चारही पोलिसांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. पण अशाप्रकारे पोलिसांनीच एका सराफा व्यावसायिकाला लुटल्याने पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे.

 

हवालदार महेश गाढवे, सर्फराज देशमुख, शिपाई संदीप साळवे, सोमनाथ कांबळे अशी कारवाई केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावं आहेत. हे चारही कर्मचारी पुण्यातील वानवडी पोलीस ठाण्यात कार्यरत होते.

 

चारही जण काही दिवसांपूर्वी एका चोरीच्या प्रकरणात कर्नाटकातील बल्लारी इथं तपासासाठी गेले होते. यावेळी चोरट्यांनी चोरी केलेला माल बल्लारी येथील सराफा व्यावसायिकाला विकल्याची माहिती समोर आली होती.

 

चोरट्यांनी पावतीसह माल विकला होता. असं असूनही आरोपी पोलिसांनी कारवाई करण्याची धमकी देत २५ तोळे सोने लंपास केले होते.

 

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, सराफ व्यावसायिक कपिल मफतलाल जैन (रा. बल्लारी, कर्नाटक) यांनी याबाबत तक्रार दिली होती.

 

चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना पोलीस कर्मचारी गाढवे, देशमुख, साळवे, कांबळे कर्नाटकातील बल्लारी शहरात गेले होते.

 

चोरीच्या गुन्ह्यात ताब्यात घेतलेल्या चोरट्याकडे सुवर्णहार गहाण ठेवल्याची पावती होती. सुवर्णहार जैन यांच्याकडे गहाण ठेवण्यात आला होता.

 

सुवर्णहार गहाण ठेवून चोरट्याला तीस हजार रुपये दिल्याची कबुली जैन यांनी दिली होती. त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी जैन यांना धमकावले. ‘तुझ्याकडे आणखी १०० तोळे सोने असून, ते चोरांकडून घेतले आहे.

 

तू ज्यांच्याकडून सोने घेतले आहे. ते चोरटे कोयता गँगमधील असून, त्यांनी पोलिसांवर देखील हल्ला केला आहे,’ असे सराफा व्यावसायिक जैन यांना सांगण्यात आले.

 

तडजोडीत जैन यांनी बल्लारीत तपासासाठी आलेल्या चार पोलिसांना २५ तोळे सोन्याचे दागिने दिले. या प्रकरणी आरोपी पोलिसांवर कारवाई करण्यात आली असून त्यांना प्रत्येक पाच हजारांचा दंड आकरला आहे. पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *