महायुतीच्या मित्रपक्षाने दिली थेट धमकी;आम्हाला लोकसभेच्या जागा द्या, अन्यथा परिणाम भोगावे लागतील
Allies of the Grand Alliance gave a direct threat; give us Lok Sabha seats or face the consequences
राज्यातील महायुतीत जागा वाटपाचा तिढा कायम असून आज दिल्लीत या संदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भाजप वरिष्ठ नेत्यांशी चर्चा होणार आहे.
त्यात आता महायुतीचा आणि शिवसेनेचा मित्र पक्ष असलेला पीपल रिपब्लिकन पक्षाने (कवाडे गट ) देखील आम्हाला महायुतीत
दोन जागा मिळाव्यात अशी मागणी केली आहे. आम्हाला गृहीत धरू नये अन्यथा परिणाम भोगावे लागतील असा इशाराही महायुतीला दिला आहे.
पीपल रिपब्लिकन पक्षाचे जयदीप कवाडे म्हणाले की, महायुतीत जागावाटप चर्चा सुरू असताना महायुतीचा प्रमुख घटक पक्ष पीपल्स रिपब्लिकन पार्टीला दोन जागा मिळाव्यात अशी राज्यभरातून कार्यकर्त्यांची
आणि पक्षाची भूमिका आहे. या संदर्भात आम्ही मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेतली. रामटेक आणि लातूरची जागा आम्हाला मिळावी अशी मागणी केली.
या चर्चेत सकारात्मक आश्वासन आम्हाला देण्यात आले, पण खऱ्या अर्थानं भीमशक्तीचा सन्मान करायचा असेल तर जागा द्या.
महायुतीतील अनेक घटक पक्ष आम्हाला येऊन भेटतात, आपण काहीतरी भूमिका घ्यावी असा सूर त्यांच्यात आहे. त्यामुळे महायुतीमध्ये आम्हाला
जर दोन जागा मिळाल्या नाहीत तर आम्ही आमची वेगळी भूमिका घेऊ. महायुतीने आम्हाला गृहीत धरू नये. परिणाम भोगावं लागेल असं ते म्हणाले.
राज्यभरात एक मोठा जनसमुदाय आणि वर्ग आमच्या सोबत आहे. वर्षभरापूर्वी शिवसेनेबरोबर आलो, युतीत सहभागी झालो. मित्र पक्षांचा सत्तेत आणि या जागा वाटपामध्ये युतीत सन्मान सन्मान होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
राज्यातील जागावाटपाच्या चर्चेचा तिढा अद्याप सुटला नाही. त्यामुळे यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत.
शुक्रवारी रात्री दिल्लीमध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे चर्चा करणार आहेत. त्यानंतर जागावाटपावर अंतिम शिक्कामोर्तब केलं जाणार आहे.
महायुतीच्या जागावाटपाच्या चर्चेला गती आली असून येत्या दोन दिवसात ते जाहीर होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
राज्यामध्ये भाजपकडून जवळपास 32 जागांवर दावा करण्यात आला आहे. त्यामध्ये शिंदे गटाच्या आणि अजित पवार गटाच्या काही जागांचा समावेश आहे.
दरम्यान महायुतीत जागा वाटपावरुन गेल्या काही दिवसांपासून खलबतं सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा महाराष्ट्र दौरा झाल्यानंतर जागा वाटपाच्या हालचालींना वेग आलाय.
दरम्यान, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार गटाच्या वाट्याला कमी जागा येणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँगेसच्या वाट्याला कमी जागा येत असल्यामुळे पक्षांतर्गत नाराजीचा सूर उमटताना दिसतोय. कार्यकर्त्यांकडून जागा वाढवून घेण्यासाठी वरिष्ठांवर दबाव आणला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्यानंतर शिंदे आणि अजित पवार यांच्या वाट्याला केवळ विनींग सीट दिल्या जातील, अशा चर्चा सुरु झाल्या.
अजित पवार यांच्या वाट्याला एक अंकी आकडा येत असल्यामुळे पक्षातील नेत्यांकडून अमित शाह यांच्याकडे जादा जागांची मागणी केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
अजित पवार यांच्या वाटल्या केवळ 1 अंकी जागा येत असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नाराज होते. मात्र, आता उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यसभेचे सदस्य प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे दिल्लीला रवाना झाले आहेत.
त्यामुळे आज भाजपचे केंद्रीय नेतृत्व, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जागा वाटपाबाबत चर्चा होईल आणि जागा वाटपासंदर्भात ठोस निर्णय होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अजित पवार यांना जागा वाढवून देण्यास नकार दिल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागलाय.
दरम्यान, जागा वाटपासंदर्भात एकनाथ शिंदे आज (दि.8) दिल्लीला जाणार आहेत. मात्र, दुसरीकडे दिल्लीला बैठकीला जायचं की नाही याबाबत
अजित पवार यांच्या गटामध्ये स्पष्टता नव्हती. मात्र, अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे आता जागावाटपासाठी दिल्लीला रवाना झाले आहेत.








