मविआ उमेदवारांची पहिली यादी रविवारी
First list of Mavia candidates on Sunday
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवारांबाबत सविस्तर चर्चा जवळपास पूर्ण झाली आहे. उमेदवारांची पहिली यादी २० ऑक्टोबरला जाहीर केली जाईल,
अशी माहिती राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी नवी दिल्लीतील बैठकीनंतर दिली. नवी दिल्लीत झालेल्या या बैठकीत एकूण ८४ जागांबाबत चर्चा झाल्याचेही कळते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अमित शहा यांच्या इशाऱ्यावर चालण्याची सवय करावी लागेल, असा टोलाही वडेट्टीवार यांनी लगाविला.
विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसचे जागावाटप निश्चित करण्यासाठी महाराष्ट्रातील नेते मंडळींची नवी दिल्लीत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधिमंडळातील गटनेते बाळासाहेब थोरात यांच्यासह इतर अनेक नेते मंडळी उपस्थित होते. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार यांनी ही माहिती दिली.
‘लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात जे चित्र होते. तेच चित्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी दिसत आहेत. त्यामुळे कोणाच्या दौऱ्यावर मते विभागली जातील, असे वाटत नाहीत’,
असे यावेळी वडेट्टीवार म्हणाले. ‘महादेव जानकर यांच्यासोबत सध्या जे काही घडत आहेत, त्यामुळे ते अस्वस्थ आहेत. त्यांचा पुढचा निर्णय आमच्यासोबत येण्याचा असेल तर आम्ही त्यांच्यासोबत पुढे जायला तयार आहोत’,
असेही त्यांनी स्पष्ट केले. ‘शिवसेनेसोबतचा ४० वर्षांचा घरोबा असतानाही त्यांना संपविण्याचा निर्णय भाजपाने केला. जानकर हे आता आताचे आहेत. ते नवीन आहेत. त्यामुळे वापरा आणि फेका असाच हा प्रकार आहे’, अशी टीकाही वडेट्टीवार यांनी यावेळी केली.
लोकसभा निवडणुकीत चर्चेत राहिलेल्या सांगली पॅटर्नची पुनरावृत्ती आगामी विधानसभा निवडणुकीत होऊ शकते, अशी जोरदार चर्चा काँग्रेसमध्ये रंगताना दिसते.
विदर्भात सांगली पॅटर्न होऊ शकतो, अशी चर्चा सध्या पक्षात रंगताना दिसते. विदर्भातील काटोल या मतदारसंघात पक्षातील माजी मंत्री श्रीकांत जिचकार यांचे पुत्र याज्ञवल्क्य जिचकार इच्छुक आहेत.
पण जागावाटपाच्या चर्चेत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वाट्याला गेल्याचे कळते. या जागेवर माजी गृहमंत्री अनिल देशमुख
यांचे नाव चर्चेत असून त्यांना उमेदवारी दिली. तर जिचकार पुत्र बंडखारी करीत अपक्ष लढण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे.