आघाडीत बिघाडी;शरद पवारानंतर काँग्रेसनेही दिला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात उमेदवार
Breakdown in the alliance; after Sharad Pawar, Congress also fielded a candidate against Thackeray's candidate
महाविकास आघाडीमध्ये मागील काही दिवसांपासून जागावाटपाच्या मुद्द्यावरुन वाद सुरु असतानाच आता उमेदवारी यादीमध्येही या वादाचे प्रतिबिंब पाहायला मिळत आहे.
काँग्रेसने काल सकाळी दुसरी यादी जाहीर केल्यानंतर रात्री उशीरा उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. विशेष म्हणजे ज्या मतदारसंघामध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं उमेदवार आधीच जाहीर केला आहे
तिथे काँग्रेसनेही तिसऱ्या यादीत उमेदवार जाहीर केली आहे. तर मुंबईत एका महत्त्वाच्या नेत्याने ज्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली
त्यापेक्षा फार वेगळ्याच मतदारसंघातून या नेत्याला उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे चर्चा स्तरावरील जागावाटपाचा घोळ आता महाविकास आघाडीच्या उमेदवार यादीतही झळकू लागला आहे.
काँग्रेसने शनिवारी रात्री 16 उमेदवारांची यादी जाहीर केली. पक्षाच्या तिन्ही याद्यांमध्ये एकूण 87 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
त्यामुळे तिन्ही पक्षांमध्ये 85-85-85 जागांचं समान वाटप होण्याची शक्यताही जवळपास संपुष्टात आली आहे. विशेष म्हणजे काँग्रेसने तिसऱ्या यादीत जाहीर केलेल्या उमेदवारांमध्ये दिग्रस मतदारसंघांतून माणिकराव ठाकरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
या मतदारसंघातून आधीच पवन जयस्वाल यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे आता दिग्रसमध्ये महाविकास आघाडीचे दोन उमेदवार झाहीर झाले असून
महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये समन्वय नसल्याचं दिसून येत आहे. काँग्रेसने सांगली मतदारसंघातून पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
दुसरीकडे मुंबईमध्ये वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागितलेल्या सचिन सावंत यांना काँग्रेसने वेगळ्यात मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.
यासंदर्भात मतदारसंघ बदलून देण्याची मागणी सचिन सावंत यांनी तिसरी यादी जाहीर झाल्यानंतर आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन मतदारसंघ बदलून देण्याची मागणी केली.
“मी वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. तीथेच लढावे अशी माझी इच्छा होती. परंतु तो मतदारसंघ शिवसेना उबाठा पक्षाकडे गेला आहे.
मी अंधेरी पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती. तरी पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मनापासून धन्यवाद! परंतु मी महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे प्रभारी रमेश चेन्नितला यांना पक्षाने निर्णय बदलावा
याकरिता विनंती केली आहे. मी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी माझ्या विनंतीचा सहानुभूतीपूर्वक विचार करतील ही आशा बाळगतो,” असं सचिन सावंतांनी म्हटलं आहे.
काँग्रेसच्या तिसऱ्या यादीतील उमेदवार
1. राणा सानंदा – खामगाव
2. हेमंत चिमोटे – मेळघाट
3.मनोहर पोरेटी – गडचिरोली
4. दिग्रस – माणिकराव ठाकरे
5. नांदेड दक्षिण – मनोहर अंबाडे
6.देगलूर – निवृत्तीराव कांबळे
7. मुखेड – हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर
8.एजाज बेग – मालेगाव मध्य
9. शिरीष कुमार कोतवाल – चांदवड
10. लकीभाऊ जाधव – इगतपुरी
11. भिवंडी पश्चिम -दयानंद चोरघे
12. अंधेरी पश्चिम – सचिन सावंत
13. वांद्रे पश्चिम – असिफ झकारीया
14. तुळजापूर – कुलदीप पाटील
15. कोल्हापूर दक्षिण – राजेश लाटकर
16. सांगली – पृथ्वीराज पाटील