मंत्रिमंडळात प्रवेशावरून शिंदेंचा विश्वासू नेता म्हणाला ,मी नापास होऊ शकत नाही

Shinde's trusted leader said on entering the cabinet, "I cannot fail."

 

 

 

राज्यात महायुती सरकार स्थापन झाले असले तरी मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला आहे. सत्ता वाटपाचा तिढा कायम आहे. राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराकडे सत्ताधारी महायुतीच्या आमदारांचे लक्ष लागले आहे.

 

येत्या 14 डिसेंबर रोजी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची चर्चा आहे. तर, दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना बंडात साथ देणाऱ्या विश्वासू शिलेदारांच्या मनातही धाकधूक वाढली आहे.

 

मागील मंत्रिमंडळातील काहींना यंदा मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार असल्याचे वृत्त आहे. एकनाथ शिंदे यांचा विश्वासू शिलेदार मात्र, या वृत्ताने संतापला आहे.

 

महायुतीच्या मंत्रिमंडळाच्या खाते वाटपाचा आणि संभाव्य मंत्र्यांच्या नावावरून खल सुरू आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेतील काहीजणांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यास भाजपने विरोध केल्याचे वृत्त आहे.

 

तर, दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मागील सरकारच्या मंत्र्यांचे मूल्यमापन करणारे प्रगती पुस्तक समोर आले. यामध्ये संजय राठोड यांच्या नावा समोर नापास असा शेरा लावण्यात आला. त्यावर आमदार संजय राठोड यांनी संताप व्यक्त केला आहे.

 

निवडणुकी नंतर मंत्रिमंडळ स्थापनेच्या आधी संजय राठोड यांना मंत्रिमंडळातून डावलणार असल्याचे वृत्त समोर आले. त्यानंतर आता संजय राठोड हे स्वतः हुन पुढे आले आहेत.

 

त्यांनी स्वतः केलेल्या कामाची माहिती देत मी नापास झालोच नाही अशी भूमिका सांगितली आहे. माध्यमांमध्ये येत असलेल्या बातम्यामुळे आपण व्यथित झालो असल्याचे संजय राठोड यांनी सांगितले.

 

संजय राठोड यांनी म्हटले की, प्रगती पुस्तकात मी नापास अशा बातम्या जिव्हारी लागणाऱ्या आहे. मी नापास असूच शकत नाही, मी जनतेसाठी झोकून देऊन काम करणारा असल्याचे त्यांनी सांगितले.

 

दरम्यान मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस पहिल्यांदाच दिल्लीला गेल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांची शिष्टाचार भेट घेणार आहेत.

 

शिवसेनेला गृहखाते मिळणार की नाही याबाबत सांशकता आहे. तर दुसरीकडे महसूल खात्याबाबतही चर्चा सुरु आहे. यामुळे शिवसेनेत नाराजी असल्याचे बोलले जात आहे.

 

महायुतीत भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे तीन पक्ष असल्याने चर्चेला उशीर होत असल्याचे त्यांनी मान्य केले. मात्र १४ डिसेंबरपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे.

 

देवेंद्र फडणवीस सुमारे अडीच वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्र्यांसह गृहमंत्रालय सांभाळत होते. आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि शिंदे उपमुख्यमंत्री आहेत. शिवसेनेकडून भाजपाकडे गृहमंत्रालयाची मागणी करत असल्याची चर्चा आहे.

एकनाथ शिंदे ठाण्यात त्यांच्या घरीच थांबले आहेत. नुकतेच त्यांच्यावर उपचार सुरू होते. ते आजारपणातून बरे होत आहेत. त्यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

 

यामुळे त्यांनी दिल्ली दौरा टाळला असल्याचे बोलले जात आहे. तर शिवसेनेला नगरविकास खाते मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भाजपाच्या कोट्यातून २१ ते २२ मंत्री होऊ शकतात.

 

चार ते पाच मंत्रीपदे रिक्त ठेवली जाऊ शकतात. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह जास्तीत जास्त ४३ मंत्री असू शकतात. खरे तर ४० मंत्रिपद बाकी असताना महायुतीत भाजपा, शिवसेना

 

आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्रिपदासाठी अनेक इच्छुकांची भाऊगर्दी झालेली पाहायला मिळत आहे. अनेक आमदार मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसल्याचे चित्र आहे.

 

मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱ्यांना नाराज न करता मंत्रिपदाचा वेगळाच फॉर्म्युला एकनाथ शिंदेंनी काढल्याचे बोलले जात आहे.

 

एकीकडे महायुतीतील मंत्रिमंडळ विस्तार १४ डिसेंबर रोजी होणार असल्याची दाट शक्यता आहे. हिवाळी अधिवेशन १६ डिसेंबरपासून नागपूर येथे सुरू होणार आहे.

 

१४ डिसेंबरपर्यत निर्णय न लागल्यास अधिवेशनात शपथविधी होणार असल्याचीही चर्चा मंत्रालयात सुरु आहे. अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार होणार असून,

 

महायुतीत ४० मंत्रिपद आहेत. त्यात भाजपाला सर्वाधिक १३ ते १५ मंत्रिपद मिळणार आहेत. तर शिंदेच्या शिवसेनेला आठ ते दहा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सहा ते सात मंत्रिपद मिळणार अशी चर्चा आहे.

 

गेल्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेचे अनेक आमदार मंत्रिपदासाठी इच्छुक होते. शेवटपर्यंत मंत्रिपदासाठी ते आस लावून बसले होते. परंतु त्यांना मंत्रिपद मिळालेले नाही.

 

त्यामुळे मागील वेळी ज्यांना मंत्रिपद मिळाले नाही, त्यांना यावेळी मंत्रिपद मिळणार असल्याचे शिवसेनेच्या गोटात चर्चा आहे. शिवसेनेतील ज्येष्ठ नेते आणि नवीन आमदार हे मंत्रिपदासाठी इच्छुक असून,

 

केवळ दहा मंत्रिपदं मिळणार तर दुसरीकडे इच्छुकांची भाऊगर्दी वाढणार आहे. त्यामुळे कोणालाही नाराज करायचे नाही म्हणून यावर एकनाथ शिंदेंनी एक वेगळाच तोडगा काढलाय.

 

शिवसेना पक्षात अडीच-अडीच वर्षं मंत्रिपद देण्याचा फॉर्म्युला एकनाथ शिंदे यांनी अवलंबला असल्याचे बोलले जात आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *