धनुष्यबाण,घड्याळ कोणाची? होणार लवकरच फैसला
Whose bow and arrow is the watch? Will be decided soon
गेल्या दोन वर्षांत राज्यात झालेल्या पक्षफुटीच्या प्रकरणांमुळे राज्याचं राजकारण ढवळून निघालं. एकाच पक्षाचे दोन गट होऊन एक गट सत्तेत तर एक गत विरोधकांत जाऊन बसल्याने सामान्य जनता आणि कार्यकर्तेही पार गोंधळून गेले.
शिवसेना पक्षात फूट पडल्याच्या घटनेला दोन वर्षे पूर्ण झाली तर त्याचीच पुनरावृत्ती होत वर्षभरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही फूट पडली. त्यामुळे शिवसेनेचे एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट असे दोन गट पडले तर
राष्ट्रवादीचे अजित पवार गट व शरद पवार गट असे दोन गट पडले. दोन्ही गट मूळ पक्ष आपला असल्याचा दावा करत आहेत. ही दोन्ही प्रकरणे सध्या न्यायप्रविष्ट आहेत.
विधानसभा निवडणुकीआधीच दोन्ही प्रकरणांमध्ये खरा पक्ष कोणाचा, याचा फैसला होण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे जुलै महिन्यात या प्रकरणांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार आहे.
सुप्रीम कोर्टाकडून विधानसभा अध्यक्षांकडे या प्रकरणाचा निकाल लावण्याचे काम सोपवण्यात आले होते. यावेळेस एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पक्षाचं मूळ चिन्ह धनुष्यबाण देण्यात आलं.
तर राष्ट्रवादीतही ‘घड्याळ’ हे मूळ चिन्ह अजित पवारांना देण्यात आलं. त्यामुळे विरोधात असलेल्या उद्धव ठाकरे व शरद पवार यांनी सुप्रीम कोर्टात वेगवेगळ्या याचिका दाखल केल्या होत्या. त्यावर या महिन्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिलं. त्यांच्या या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली.
मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून या याचिकेवर सुनावणी झालेली नाही. आता याची तारीख ठरली असून येत्या १५ जुलै रोजी याचिकेवर सुनावणी होणार असल्याचं कळतंय.
त्याचबरोबर आमदार अपात्र प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाविरोधातही ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. या याचिकेवरील सुनावणी देखील १९ जुलैला होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाने देखील आमदार अपात्र प्रकरणाच्या निकालावरून कोर्टात याचिका दाखल केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटातील १४ आमदार अपात्र होते.
ते करण्यात आलेले नाही, असं शिंदे गटाने आपल्या याचिकेत म्हटलं आहे. या प्रकरणाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. यावरही १९ जुलै रोजी निर्णय होण्याची शक्यता आहे.
निवडणूक आयोगाने घड्याळ चिन्ह आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्षाचं नाव अजित पवार यांना दिल्यानंतर शरद पवार यांनी देखील सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.
या याचिकेवर देखील १६ जुलै रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे. शरद पवार यांच्या वतीने मागच्या सुनावणीवेळी अजित पवार हे प्रचारात शरद पवार यांचा फोटो वापरत असल्याचा दावा केला होता.
त्यावर कोर्टाने कडक ताशेरे ओढत अजित पवार यांना हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, अशी जाहिरात वृत्तपत्रात देण्याचे आदेश दिले होते.
लोकसभा निवडणुकीनंतर आणि विधानसभा निवडणुकीआधी या दोन्ही पक्षांबाबत महत्वाच्या सुनावण्या सुप्रीम कोर्टात पार पडणार असल्याने सर्वांचं याकडे लक्ष असणार आहे.