महायुतीचा 100 दिवसांच्या रिपोर्ट कार्ड;शिंदेंचे मंत्री फेल तर दादा,फडणवीसांचे मंत्री सरस
Mahayuti's 100-day report card; Shinde's ministers failed while Dada and Fadnavis' ministers excelled

राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर सर्व विभागांना 100 दिवसांच्या कामांचा टास्क देण्यात आला होता. या 100 दिवसांमध्ये शासनाच्या सर्व 48 विभागांनी 100 दिवसांचा धोरणात्मक बाबींचा कार्यक्रम हाती घेऊन
महत्त्वाची नवीन धोरणे, दूरगामी निर्णय व लोकाभिमुख उपक्रमांची आखणी सुरू केली. महायुती सरकारच्या या 100 दिवसांच्या कामांचे प्रगती पुस्तक समोर आले आहे. पहिल्या 100 दिवसाच्या कामकाजात पहिल्या 5 विभागामध्ये भाजप आणि राष्ट्रवादीचा वरचष्मा असल्याचे दिसून आले.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत आपल्या सरकारच्या 100 दिवसांचा रिपोर्ट कार्ड जारी केला. 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचे भारतीय गुणवत्ता परिषद तर्फे अंतिम मूल्यमापन करण्यात आले.
या निकालानुसार वेबसाईट सुधारणा, कार्यालयीन सोयीसुविधा, तक्रार निवारण, सुलभ जीवनमान, गुंतवणुकीस चालना, तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी 10 मुद्यांवर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या 5 मंत्रालयीन विभागांचे सचिव, 5 मंत्रालयीन विभागांचे आयुक्त,
5 जिल्हाधिकारी, 5 पोलीस अधीक्षक, 5 मुख्य कार्यकारी अधिकारी (जि.प.), 4 महापालिका आयुक्त, 3 पोलीस आयुक्त, 2 विभागीय आयुक्त आणि 2 पोलिस परिक्षेत्र महानिरीक्षक यांची यादी जाहीर करण्यात आली.
पहिल्या पाच सर्वोत्तम विभागांमध्ये महिला व बाल विकास विभागाने बाजी मारली आहे. या विभागाला 80 टक्के गुण मिळाले आहे.
त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने 77.95 गुण मिळाले. कृषी विभाग 66.15 गुण मिळाले आहे. तर, ग्रामविकास विभागाला 63.85, आणि परिवहन व बंदरे विभागाला 61.28 गुण मिळाले आहेत.
सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या विभागात पहिल्या पाचमध्ये सहा मंत्र्याच्या विभागाचा समावेश आहे. राष्ट्रवादीचे 2, भाजपचे 3 तर शिवसेना शिंदे गटाच्या एका मंत्र्याचा समावेश आहे.
पहिल्या स्थानी अदिती तटकरे यांचे खाते आहे. तर, शिवेंद्रराजे भोसले यांचे खाते दुसऱ्या क्रमांकावर असून माणिकराव कोकाटे यांचे कृषी खाते तिसऱ्या क्रमांकावर आहे.
भाजपचे संकटमोचक असलेले गिरीश महाजन यांच्या खात्याने चौथे स्थान पटकावले आहे. तर, पाचव्या स्थानावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांचा विभाग आहे.
फडणवीस सरकारच्या या रिपोर्ट कार्डमुळे मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांची कामगिरी फारशी प्रभावी राहिली नसल्याचे आता या रिपोर्ट कार्डमुळे समोर आले आहे.
त्यामुळे आता शिंदे गटाच्या मंत्र्यांवर आपली कामगिरी उंचावण्याचा दबाव असणार आहे. अन्यथा त्यांच्याकडील खाते काढण्याबाबत एकनाथ शिंदे यांना भाजपकडून विचारणा होण्याची शक्यता आहे.
महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. शिंदे यांची अजितदादांकडून कोंडी होत असल्याचे म्हटले जात आहे.
तर, दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना घेतलेल्या निर्णयाची समीक्षा घेणे, पुनर्विचार करणे अथवा त्याला रद्द करण्यात आले आहे.
त्यावरून शिंदे गटात नाराजीचे वातावरण असल्याचे म्हटले जात आहे. आता रिपोर्ट कार्डमध्ये शिंदे गटाच्या मंत्र्यांच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.