महायुतीत खाते,मंत्र्यांची संख्यावरून कलगीतुरा ; उद्या नागपूरमध्ये शपथविधी ?

Mahayuti: Dispute over number of portfolios and ministers; Swearing-in ceremony in Nagpur tomorrow?

 

 

 

खातेवाटप, मंत्र्यांची संख्या यावरून महायुतीमध्ये घोळ कायम राहिल्याने शनिवारी प्रस्तावित असलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आता रविवारी नागपूरमध्ये होईल असे सांगितले जाते.

 

मात्र त्याला अधिकृत दुजोरा देण्यातआलेला नाही. भाजप नेत्यांना अजूनही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मनधरणी करावी लागत असताना भाजपमध्येही काही नावांवर आक्षेप असल्याचे समजते. दरम्यान शिंदे यांनी शुक्रवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली.

 

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून दोन आठवडे तर मुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडून आठवडा उलटला तरीही संपूर्ण सरकार आकारास आलेले नाही.

 

सोमवारपासून नागपूरमध्ये सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधीनंतर पहिल्याच पत्रकार परिषदेत सूतोवाच केले होते.

 

फडणवीस यांनी नवी दिल्लीत गृहमंत्री अमित शहा आणि पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी भाजपच्या मंत्र्यांचे नावे आणि मित्रपक्षांच्या खात्यांवर चर्चा केली होती.

 

शनिवारी विस्तार होईल, अशी शक्यता वर्तविली जात होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तसे संकेत दिले होते. पण शुक्रवारी रात्रीपर्यंत विस्ताराबाबत काहीच निर्णय झाला नव्हता. विस्तार रविवारी दुपारी नागपूरमध्ये होईल, असे संकेत सरकारी सूत्रांकडून देण्यात आले.

 

महायुतीत मंत्र्यांची संख्या आणि खातेवाटप यावर एकमत न होऊ शकल्याने विस्तार लांबणीवर पडल्याचे सांगण्यात येते. उपमुख्यमंत्री शिंदे यांचे अजूनही समाधान झालेले नाही.

 

यामुळेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिंदे यांची भेट घेतली. फडणवीस यांनीही शिंदे यांच्याशी चर्चा केल्याचे सांगण्यात येते. महायुतीत शिवसेनेला (शिंदे) १२ किंवा १३ मंत्रीपदे देण्याची भाजपने तयारी दर्शविली आहे.

 

पण खातेवाटपाचा तिढा कायम होता. शिंदे यांना नगरविकासबरोबर महसूल खाते हवे आहे. महसूल सोडण्याची भाजपची तयारी नाही. याशिवाय शिंदे यांच्या काही माजी मंत्र्यांच्या फेरसमावेशास भाजपने आक्षेप घेतल्याने शिंदे यांनी नापसंती व्यक्त केली आहे.

 

शनिवारी विस्तार होण्याची शक्यता गृहीत धरून राजभवनवर सारी तयारी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने शनिवारी विस्तार करण्याची सूचना केल्यास सारी तयारी झाल्याचे राजभवनातून सांगण्यात आले.

 

सोमवारपासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू होत असल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांची नागपूरला जाण्याची लगबग सुरू झाली आहे.

 

रविवारी चहापानाच्या पूर्वी दुपारी नागपूरमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याची योजना आहे. नागपूरमध्ये शपथविधीची तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सरकार स्थापनेनंतर नवीन मंत्रिमंडळाचा विस्तार आतापर्यंत मुंबईतच होण्याची परंपरा आहे. प्रथमच नागपूरमध्ये नवीन सरकारचा विस्तार होत आहे. शिवसेनेतील फुटीनंतर १९९१ मध्ये छगन भुजबळ आणि राजेंद्र गोडे या दोघांचा नागपूरमध्ये शपथविधी झाला होता.

 

●तिन्ही पक्षांना पायाभूत सुविधांशी संबंधित खाती हवी आहेत. गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम या भाजपकडे असलेल्या खात्यांवर राष्ट्रवादीचे लक्ष आहे.

 

●भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून अद्याप पक्षाच्या मंत्र्यांची नावे मुंबईत कळविण्यात आलेली नाहीत. यामुळे विस्तारास विलंब होत असल्याचे भाजपच्या सूत्राकडून सांगण्यात आले.

 

●भाजपमध्ये ज्येष्ठ नेत्यांच्या समावेशाबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. काही ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिमंडळात संधी दिली जाणार नाही, असे संकेत प्राप्त होत आहेत.

 

भाजपमधील वरिष्ठ सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आणि नव्या मंत्र्यांचा शपथविधी नागपुरातच होण्याची दाट शक्यता आहे. हा शपथविधी नागपुरात राज्यपालांचं निवासस्थान असलेल्या राजभवन परिसरात होणार असल्याची माहिती मिळत आहे.

 

सूत्रांच्या माहितीनुसार, महायुतीच्या मंत्र्यांचा शपथविधी 15 डिसेंबरला नागपुरात होण्याची दाट शक्यता आहे. यावेळी महायुतीचे 35 नेते मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात.

 

भाजपचं त्यांच्या कोट्यातील काही जागा रिक्त ठेवणार? का अशी चर्चा आहे. दरम्यान शिवसेना कोट्यातील सगळी मंत्रिपदं भरण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीही पहिल्याच विस्तारात कोटा पूर्ण करणार हा हे पाहावं लागणार आहे.

 

राष्ट्रवादीच्या आमदारांचं मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू आहे. राष्ट्रवादीचे माजी मंत्री मंत्रिपदासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. मंत्रिपद कायम राहावं, यासाठी वरिष्ठ नेते कसोशीनं प्रयत्न करत आहेत.

 

हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील देवगिरी बंगल्यावर दाखल झाले होते. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेही पोहोचले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मंत्रिमंडळ विस्तारात 8 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्री मिळण्याची शक्यता आहे.

 

भाजपाचे संभाव्य मंत्री?
1) चंद्रशेखर बावनकुळे
2) सुधीर मुनगंटीवार

 

3) राधाकृष्ण विखे पाटील
4) गिरीष महाजन
5) चंद्रकांत पाटील

 

6) रवींद्र चव्हाण
7) संभाजी पाटील
8) अतुल सावे

9) परिणय फुके
10) संजय कुटे
11) पंकजा मुंडे

राज्य मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेच्या वाट्याला येणाऱ्या मंत्र्यांना अडीच वर्षाचा कालावधी मिळू शकतो. मंत्र्यांचा पहिल्या अडीच वर्षाचा कालावधी संपल्यावर दुसऱ्या आमदारांना पुढील अडीच वर्षाचा कालावधी मंत्रीपदासाठी मिळणार आहे.

 

शिवसेनेच्या या अडीच-अडीच वर्षाच्या फॅार्मुलामुळे शिवसेना पक्षातील आमदारांच्या मोठ्या संख्येला मंत्रीपदाची संधी मिळणार असून मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेचा सामाजिक, प्रादेशिक आणि सर्वाधीक आमदारांना मंत्री पदाची संधी देणारा फॅार्मुला असणार आहे.

 

म्हणजेच, शिवसेनेला 10 मंत्रीपदे मिळत असतील तर या पाच वर्षांत 20 आमदारांना मंत्रीपदे मिळणार आहेत. सूत्रांनुसार, पहिल्या अडीच वर्षात मागील मंत्रिमंडळातील नेत्यांना डच्चू मिळू शकतो.

 

तर, काही नवीन चेहरे समोर येऊ शकतात. त्यात संजय शिरसाट, भरत गोगावले, प्रताप सरनाईक, खोतकर आणि शिवतरे, यांच्या नावांवर जवळपास शिक्कामोर्तब झाले असून बाकीचे जुन्या मंत्रिमंडळातीलच मंत्र्यांना संधी देण्यात येणार आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

16:23