भाजपच्या विरोधामुळे, शिंदेंच्या गुवाहाटीत बंडातील विश्वासू साथीदाराचेच मंत्रिपद धोक्यात ?
Due to BJP's opposition, is the ministerial post of Shinde's trusted ally in the Guwahati rebellion in jeopardy?

महायुतीच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार नागपूरमध्ये रविवारी, 15 डिसेंबर रोजी होणार आहे. मंत्रिमंडळात आपली वर्णी लावण्यासाठी इच्छुक आमदारांनी लॉबिंगलाही सुरुवात केली आहे.
भाजपच नव्हे तर शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी सागर बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
आज, रात्रीपर्यंत शपथ घेणाऱ्या आमदारांची नावे समोर येण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना बंडात साथ देणाऱ्या शिवसेना आमदारांची धाकधूक वाढली आहे.
गुवाहाटी रिटर्न असणाऱ्या दोन आमदारांनी 5 तास प्रतिक्षा करूनही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट नाकारली, असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट अशा तिन्ही प्रमुख पक्षांची यादी दिल्लीत पोचली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आज दुपारपर्यंत यादीवर अंतिम शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती आहे.
या यादीवर शिक्कामोर्तब झाल्यावरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या मंत्री म्हणून शपथ घेणाऱ्या आमदारांना फोन करणार असल्याची माहिती आहे. तर, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे आपआपल्या पक्षातील नेत्यांना फोन करणार आहेत.
महायुती सरकारच्या या नव्या मंत्रिमंडळात आपली वर्णी लागावी यासाठी अनेक इच्छुक आमदारांनी लॉबिंग करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना शिंदे गटातही अनेकांनी मंत्रिपदासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
शुक्रवारी रात्री, इच्छुक आमदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा या निवास स्थानी भेट घेण्याचा प्रयत्न केला. त्यातील काहींना भेट मिळाली असल्याचे सूत्रांनी सांगितले. तर, काहींनी काही तास प्रतिक्षा केल्यानंतरही शिंदे यांनी भेट नाकारली.
एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला आव्हान देत शिवसेनेत बंड केले. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या, त्यांच्या जवळील काही आमदारांना मंत्रिमंडळात संधी मिळणार नसल्याची चर्चा आहे.
गुवाहाटीत एकनाथ शिंदे यांची बाजू मांडणारे दीपक केसरकर आणि तानाजी सावंत या दोन आमदारांनी एकनाथ शिंदे यांची शुक्रवारी रात्री भेट घेण्याचा प्रयत्न केला.
मात्र, 5 तास प्रतिक्षा करूनही शिंदे यांनी भेट दिली नाही. रात्री उशिरापर्यंत दोन्ही आमदार वर्षावर होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या काही आमदारांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यास भाजपने विरोध केला आहे. यामध्ये संजय राठोड, दीपक केसरकर, तानाजी सावंत
आणि अब्दुल सत्तार यांचा समावेश आहे. भाजपच्या या भूमिकेवर शिवसेना नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. आमच्या पक्षाचे मंत्री भाजप ठरवणार का,
असा संतप्त सवाल शिवसेना नेत्यांनी केला होता. मात्र, भाजपच्या भूमिकेसमोर एकनाथ शिंदे यांनी नरमाईची भूमिका घेतली असल्याचे दिसून येत आहे.