मंत्रिपदासाठी नाराज भाजप आमदाराची खडखड ,म्हणाले मी लायक वाटलो नसेन…
BJP MLA's anger over ministerial berth, says he didn't feel worthy...
राज्यात विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर महायुतीने पुन्हा एकदा सरकार स्थापन केले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार
आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नुकताच मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. यामध्ये महायुतीतील सर्वच पक्षांनी धक्कातंत्र वापरत ज्येष्ठांना वगळत नव्यांना संधी दिली आहे.
दरम्यान भाजपातील अनेकांना मंत्रिपदाची आशा असताना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. त्यानंतर काहींनी नाराजी व्यक्त केली तर काहींनी शांत राहणे पसंत केले.
अशात ठाणे विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी मंत्रिपदाची संधी न मिळाल्याने खदखद व्यक्त केली आहे.
आमदार संजय केळकर हे सलग तिसऱ्यांदा ठाणे विधानसभा मतदारसंघातून भाजपाकडून विजयी झाले आहेत. त्यामुळे यंदा त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी चर्चा होती.
पण हिवाळी अधिवेशनापूर्वी झालेल्या विस्तारात त्यांना स्थान मिळाले नाही. यानंतर आता केळकरांनी मंत्रिपद न मिळाल्याबद्दल खदखद व्यक्त केली आहे.
यावेळी मंत्रिमंडळात समावेश न झाल्याबाबत बोलताना आमदार संजय केळकर म्हणाले, “शेवटी पक्ष आणि पक्षाचे केंद्रीय व राज्य नेतृत्त्व निर्णय घेत असते. त्यांना कदाचित मी लायक वाटलो नसेन त्याच्यामुळे नाही घेतले.
मी पक्षाचे स्थापनेपासून काम करत आहे. त्यावेळी आमच्या डोळ्यासमोर कधी आमदार, मंत्री व्हायचेय असा कोणता विचार नव्हता. त्यामुळे मी जेव्हा लायक वाटेल तेव्हा पक्ष जबाबदारी देईल.
तीन वेळा आमदार झालो आणि वरच्या सभागृहातही होतो. त्यामुळे पक्षाला ज्या-ज्या वेळेला वाटते त्या-त्या वेळेला पक्ष जबाबदारी देत असतो. “
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातील नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. यामध्ये महायुतीतील सर्वच पक्षांनी धक्कातंत्र वापरल्याचे पाहायला मिळाले.
यात भाजपाने सुधीर मुनगंटीवार, रवींद्र चव्हाण शिवसेनेने (एकनाथ शिंदे) दीपक केसरकर, तानाजी सावंत आणि राष्ट्रवादीने (अजित पवार) छगन भुजबळ व दिलीप वळसे पाटील यांना मंत्रिमंडळातून डावलल्याचे पाहायला मिळाले.
यातील काहींनी उघड नाराजी व्यक्त केली तर काहींनी शांत राहणे पसंत केले. अशात आणखी काही आमदारांना मंत्री होण्याची आशा होती त्यांनीही नाराजी व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले होते.