मनमोहनसिंग यांची पसंद होती मारुती ८०० कार
Manmohan Singh's favorite car was Maruti 800.
माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांचे काल वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे काल (२६ डिसेंबर) त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे अवघ्या देशावर शोककळा पसरली आहे. मनमोहन सिंग यांना काल रात्री ८ वाजता दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना रात्री ९.५१ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
दरम्यान डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांचे सुरक्षा रक्षक म्हणून काम केलेले आणि सध्या केंद्रीय राज्यमंत्री असलेल्या असीम अरुण यांनी त्यांच्याबद्दल एक भावूक आठवण एक्सवर पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी मनमोह सिंग यांचा मारुती ८०० कारबद्दलचा किस्सा सांगितला आहे.
सध्या मोदी सरकारमध्ये राज्यमंत्री असलेले असीम अरुण यांनी एक्सवर माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची आणि त्यांची कार मारुती ८०० बाबतची एक भावूक आठवण शेअर केली आहे.
आपल्या पोस्टमध्ये असीम अरुण यांनी सुरुवातीला लिहिले आहे की, “डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना २००४ पासून जवळजवळ तीन वर्षे मी त्यांचा अंगरक्षक होतो.
एसपीजी मध्ये क्लोज प्रोटेक्शन टीम पंतप्रधानांच्या सुरक्षेचे सर्वात आतले वर्तुळ असते. ज्याचे नेतृत्व करण्याची मला संधी मिळाली होती. एआयजी सीपीटी ही अशी व्यक्ती असते जी कधीही पंतप्रधानांपासून दूर राहू शकत नाही. जर एकच अंगरक्षक असेल तर हा व्यक्तीही त्याच्यासोबत असतो. अशा परिस्थितीत त्यांच्यासोबत सावलीसारखे राहणे ही माझी जबाबदारी होती.”
या पोस्टमध्ये असीम अरुण यांनी पुढे लिहिले की, “डॉक्टर साहेबांकडे फक्त एकच कार होती, ती म्हणजे मारुती ८००, जी पंतप्रधानांच्या निवसस्थानात चमकणाऱ्या काळ्या BMW च्या मागे उभी असायची. मनमोहन सिंग जी मला वारंवार म्हणायचे, असीम, मला या गाडीतून प्रवास करायला आवडत नाही,
माझी कार ही (मारुती) आहे. मी समजावून सांगायचो की सर, ही कार तुमच्या लक्झरीसाठी नाही, तिची सुरक्षा वैशिष्ट्ये खास आहेत त्यामुळे एसपीजीने ती घेतली आहे. पण जेव्हा जेव्हा मारुतीच्या समोरून गाडीचा ताफा जायचा तेव्हा ते त्याकडे अगदी मनापासून पाहत रहायचे.”
पंतप्रधानपदी असताना अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले. त्यांनी गरीब, वंचितांच्या कल्याणासाठी राबवलेल्या धोरणात्मक निर्णयामुळे भारतातील कोट्यवधी लोक दारिद्र्य रेषेच्या वर आले.
दरम्यान, ते एक दूरदृष्टी असलेले धोरणी राजकारणी होते. विरोधकांच्या टीकेला ते संयमाने, तोल न ढळू देता प्रत्युत्तर द्यायचे. याच पार्श्वभूमीवर भाजपाच्या दिवंगत नेत्या सुषमा स्वराज आणि मनमोहन सिंग यांच्या संसदेतील द्वंदाची आणि त्यांचा शायराना अंदाजाची चर्चा होत आहे.
संसदेत सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना टोकाचा विरोध करतात. विरोधक सरकारने राबवलेल्या चुकीच्या धोरणावर बोट ठेवतात. तर सत्ताधारी त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतात. याच संसदेत देशाला नवा आकार देणारे धोरणात्मक निर्णय घेतले जातात. मात्र अनेकवेळा खासदारांकडून आक्षेपार्ह टीका टिप्पणी केली जाते.
दिवंगत नेत्या सुषमा स्वराज आणि मनमोहन सिंग यांच्यातील टीका आणि टीकेला दिलेले उत्तर मात्र फारच वेगळे आणि राज्यकर्त्यांपुढे नवा आदर्श निर्माण करणारे आहे.
मनमोहन सिंग आणि सुषमा स्वराज यांनी एकमेकांवर टीका करताना कुठेही पातळी ढळू दिलेली नाही. दोघांनीही एकमेकांना शायराना अंदाजात उत्तरं दिली होती. विशेष म्हणजे या दोन्ही नेत्यांनी एकमेकांना दिलेल्या उत्तरामुळे संसदेत हशाही पिकला होता.
संसदेतील हा प्रसंग 2013 सालातील आहे. त्यावेळी डॉ. मनमोहन सिंग हे पंतप्रधान होते. देशाचं नेतृत्व करत असल्याने विरोधक त्यांच्यावर सडकून टीका करायचे. संसदेत तर मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या धोरणारावर भाजपाकडून गंभीर स्वरुपाचे आरोप केले जायचे.
याच आरोपांना उत्तर म्हणून तोल ढळू न देता मनमोहन सिंग यांनी संसदेत एक दोन ओळींचा शेर म्हणून दाखवला होता. ‘हमको है उनसे वफा की उम्मीद, जो जानते नही वफा क्या है’, असं म्हणत मनमोहन सिंग यांनी भाजपावर निशाणा साधला होता. भाजपाला उद्देशून म्हटलेल्या या शेरमुळे संसदेत सत्ताधारी काँग्रेसने तेव्हा टाळ्यांचा कडकडाट केला होता.
मनमोहन सिंग यांच्या या शेरला सुषमा स्वराज यांनीदेखील तेवढ्याच शायराना अंदाजात उत्तर दिले होते. शायरीचा एक वेगळा कायदा असतो. शेर कधीच उधारी ठेवला जात नाही. मनमोहन सिंग यांचा शेर मला उधार ठेवायचा नाही. त्यामुळे मी एक नव्हे तर दोन शेर वाचते. ‘कुछ तो मजबुरीयाँ रही होगी, युँही कोई बेवफा नही होता.
तुम्ही या देशासोबत बेवफाई करत आहात त्यामुळे आम्ही तुमच्याप्रती वफादार राहू शकत नाही, असे सुषमा स्वराज पहिला शेर बोलताना म्हणाल्या होत्या. तसेच ‘तुम्हे वफा याद नही, हमे जफा याद नही. जिंदगी और मौत के दो ही तो तराणे है, एक तुम्हे याद नाही एक हमे याद नही,’ असा दुसरा शेर सुषमा स्वराज यांनी मनमोहन सिंग यांना उद्देशून बोलून दाखवला होता.
अशाच एका 2011 सालच्या प्रसंगात सुषमा स्वराज यांनी मनमोहन सिंग यांच्यावर टीका करताना एक शेर सांगितला होता. तुम्हाला उर्दू भाषा चांगल्या प्रकारे समजते. आपलं मत सोप्या शब्दांत, अगदी साध्या पद्धतीने सांगण्याची शेरमध्ये फार मोठी ताकद असते. त्यामुळेच एका शेरच्या माध्यमातून मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे,
असे सुषमा स्वराज म्हणाल्या होत्या. तसेच “तू इधर-उधर की ना बात कर, ये बता की कॉफिला क्यो लुटा, हमे रहजनोंसे गिला नाही, तेरी रहबरीका खयाल है” अशा समर्पक शब्दांचा वापर करून सुषमा स्वराज यांनी मनमोहन सिंग यांच्यावर टीका केली होती.
सुमषा स्वराज यांच्या या टीकेला मनमोहन सिंग यांनीही तेवढ्याच समर्पक अंदाजात उत्तर दिले होते. माना की तेरी दीद के काबील नही हूँ मै, तू मेरा शौक तो देख मेरा इतजार तो कर, असे मनमोहन सिंग म्हणाले होते.