भाजप मुख्यमंत्र्यांचा राजीनामा
BJP Chief Minister's resignation

मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी रविवारी संध्याकाळी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.
त्यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला आहे. गेल्या वर्षाच्या अखेरीस मुख्यमंत्री बिरेन सिंग यांनी मणिपूरमधील हिंसाचाराबद्दल जनतेची माफी मागितली होती.
मणिपूरमध्ये झालेल्या हिंसाचारामुळे ते सर्वाधिक टीकेचे लक्ष्य ठरले होते. आता अमित शाह यांच्या भेटीनंतर त्यांनी राजीनामा दिला आहे.
मागील वर्षी डिसेंबर महिन्यात मुख्यमंत्री बिरेन सिंग यांनी म्हटले होते की, हे संपूर्ण वर्ष खूप वाईट गेले. गेल्या वर्षी ३ मे पासून आजपर्यंत जे काही घडले त्याबद्दल मी राज्यातील जनतेची माफी मागतो.
अनेकांनी आपल्या प्रियजनांना गमावले. अनेकांनी घरे सोडली. त्याचे मला दु:ख झाले आहे. गेल्या तीन-चार महिन्यांतील शांततापूर्ण परिस्थिती पाहता 2025 मध्ये राज्यात पूर्वस्थिती पूर्ववत होईल, अशी मला आशा आहे.
बीरेन सिंग यांच्याबाबत भाजप आमदारांमध्ये दीर्घकाळपासून नाराजी होती. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात मणिपूरमधील भाजपच्या १९ आमदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून बीरेन सिंग यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्याची मागणी केली होती.
त्या पत्रात सही करणाऱ्या आमदारांमध्ये विधानसभा अध्यक्ष थोकचोम सत्यव्रत सिंह, मंत्री थोंगम विश्वजीत सिंह आणि युमनाम खेमचंद सिंह यांचाही समावेश होता. त्या पत्रात म्हटले होती की,
मणिपूरमधील हिंसाचाराबाबत जनतेत कमालीची नाराजी आहे. जनता राज्यात शांतता का निर्माण होत नाही? यासंदर्भात प्रश्न विचारत आहे. यावर लवकर निर्णय झाला नाही तर आमदार राजीनामा देतील.
मणिपूरमध्ये दोन वर्षांपासून हिंसाचार सुरु होता. राज्यात हा गंभीर मुद्दा बनला होता. राज्यातील मेईतेई आणि कुकी समुदायांमधील वाढत्या तणावामुळे अनेक हिंसक चकमकी झाल्या.
त्यामुळे शेकडो लोकांना प्राण गमावले आणि हजारो लोकांना आपली घरे सोडून जावे लागले. जमीन, आरक्षण आणि राजकीय प्रतिनिधित्व याबाबत मेईतेई आणि कुकी समुदायांमधील वादामुळे हा हिंसाचार होता.
केंद्र सरकारने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा दलांची नियुक्ती मणिपूरमध्ये केली होती. मणिपूरमधील हिंसाचारामुळे विरोधकांच्या टीकेचे लक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहसुद्धा ठरत होते.