काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्षांनी राहुल गांधी यांच्या पॅटर्नप्रमाणेच बीड जिल्ह्यात सुरु केली सद्भावना पदयात्रा
The new state Congress president started the Sadbhavana Padayatra in Beed district following the pattern of Rahul Gandhi.

महाराष्ट्राला महापुरुषांचा आणि महान संतांच्या विचाराचा वारसा लाभलेला आहे. पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्राने कायमच देशाला दिशा दिलेली आहे. परंतु मागील काही दिवसात राज्यातील सामाजिक वातावरण बिघडले आहे.
महाराष्ट्राची उज्ज्वल परंपरा लक्षात घेऊन सद्य परिस्थितीत बंधुभाव व सामाजिक सौहार्द वाढवण्यासाठी व महाराष्ट्र धर्म जागवण्यासाठी सद्भावनेची गरज आहे.
म्हणून काँग्रेस पक्षाने सद्भावना पदयात्रेचे आयोजन केले आहे, अशी माहिती महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली. आजपासून बीड जिल्ह्यात दोन दिवसीय पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
बीडमधला सामाजिक सौहार्द संपलेला आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य लक्षात घेऊन बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथून ही पदयात्रा सुरू केली गेली.
भगवानगड आणि नारायणगड या महत्वाच्या प्रेरणास्थानी वंदन करून सामाजिक सद्भावनेसाठी साकडे घातले जाणार आहे, असे सपकाळ यांनी सांगितले.
आजच्या पदयात्रेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ, खासदार रजनीताई पाटील, बी. जी. कोळसे पाटील, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित आहेत.
लोकसभेत जोरदार यश मिळालेल्या काँग्रेस पक्षाला विधानसभेत मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे पक्ष बांधणीकरिता जमिनीवर उतरणे गरजेचे आहे,
हे ओळखून नव्या प्रदेशाध्यक्षांनी राहुल गांधी यांच्या पॅटर्नप्रमाणेच बीड जिल्ह्यातील बिघडलेल्या सामाजिक सौहार्दाच्या पार्श्वभूमीवर सद्भावना पदयात्रेचे आयोजन केले.
कोणत्याही पक्षाला जेव्हा मोठे अपयश येते, तेव्हा राजकीय नेते पदयात्रा काढूनच लोकांशी पुन्हा कनेक्ट होत असतात. इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि आत्ता राहुल गांधी यांच्या यात्रेचे उदाहरण समोर आहे.
बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या झालेल्या क्रूर हत्येने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. लोकांची मने सांधण्याकरिता यात्रेचे आयोजन केलेले असले तरी त्यातून पक्षाला फायदा होण्याची शक्यता अधिक आहे.
कारण संतोष देशमुख हे भाजपचे बूथप्रमुख त्यांचे कुटुंबी काँग्रेसच्या यात्रेत सामिल झाले. यात्रेला लोकांची अशीच भावनिक साथ मिळण्याची अपेक्षा काँग्रेस पक्षाला आहे.
संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना भेटून मस्साजोगमधून आज सकाळीच ही यात्रा निघाली. तिथून नांदुरफाटा, येळंब, नेकनूर, मांजरसुंभा, पाली या मार्गावरून ५१ किलोमीटरचा प्रवास करून यात्रा बीड शहरात पोहोचेल व बीड शहरात सद्भावना सभेने या यात्रेचा समारोप होणार आहे.
कोणताही पक्ष जेव्हा लोकांमध्ये जातो, लोकांच्या समस्या समवाजून घेतो, तेव्हा त्या पक्षाची ध्येयधोरणे लोकांपर्यंत अधिक पोहोचतात, असे मानले जाते.
काँग्रेस पक्ष सध्या उर्जितावस्थेत नाही. पक्षाला पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी सपकाळ यांच्या पदयात्रेचा फायदा होईल, असे राजकीय तज्ज्ञ सांगतात.