संजय राऊत शरद पवारांवर भडकले
Sanjay Raut lashes out at Sharad Pawar.

ज्या गद्दाराने आपले सरकार पाडले, त्या गद्दाराच्या छताखाली जाऊन अशाप्रकारच्या बैठका घेतल्या तर यामुळे मोठ्या नेत्याची विश्वासार्हता कमी होते,
असे वक्तव्य करत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्यावर शरसंधान साधले. काल शरद पवार हे एका बैठकीच्यानिमित्ताने विधानभवनात गेले होते.
त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात त्यांनी आपल्या पक्षाची बैठक घेतली. एकनाथ शिंदे यांनीही मंत्रिमंडळाची बैठक सोडून दालनात येऊन शरद पवार यांचे स्वागत केले होते.
याबाबत बोलताना संजय राऊत यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, शरद पवार हे मोठे नेते आहेत. पण ज्या एकनाथ शिंदेंनी या महाराष्ट्राला भ्रष्टाचाराची कीड आणि गद्दारीची वाळवी लावली,
त्यांच्या दालनात बैठक घेणे योग्य नाही. अख्खं विधानभवन ओस पडलं होतं का, विधानभवनाच्या परिसरात समोर राष्ट्रवादी भवन आहे, शिवसेना भवन आहे,
ते कमी पडलं म्हणून विधिमंडळात भेटी घेतल्या जातात, बैठका घेतल्या जातात. यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची विश्वासार्हता कमी होते.
आम्ही अजित पवारांच्या दालनात जाऊन बैठक घेतली असती तर आम्ही मविआच्या विरोधात गेलो, असा अर्थ होतो. त्यामुळे मविआच्या घटकपक्षांनी नियम पाळायला पाहिजेत, असे संजय राऊत यांनी म्हटले. ते गुरुवारी मुंबईत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
हे आमच्यासारख्या निष्ठावंताचं मत आहे. आम्ही इतकेही सहिष्णु नाही, एवढं आमचं मन मोठं नाही, ज्यांचं ते आहे, त्यांनी ते करावं. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विश्वासहर्ता कमी होते, असे संजय राऊत यांनी म्हटले.
शरद पवारांच्या कृतीमुळे सगळेच दुखावले गेले असतील. आम्ही त्यांच्या जागी असतो तर आम्ही अजितदादांच्या दालनात जाऊन बैठक घेतली नसती. शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याने मुख्यमंत्र्यांना भेटणे यामध्ये काहीही गैर नाही.
काल विधानभवनात बैठक होती, त्यासाठी शरद पवार आले होते. ही बैठक महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी होती. त्या बैठकीत काय घडलं, हे बाहेर आलं नाही.
या बैठकीला मुख्यमंत्र्यांनी किती प्रमुख नेत्यांना बोलावलं होतं, हे मला सांगा ना. शिवसेना या चळवळीतील महत्त्वाचा पक्षकार आहे.
आपले वकील सुप्रीम कोर्टात सीमाप्रश्नाच्या खटल्यावेळी का उपस्थित राहत नाहीत? मराठी माणूस सीमाभागात काय हाल भोगतोय, किती वर्षे हा खटला प्रलंबित आहे, याची मुख्यमंत्र्यांना काय जाणीव आहे, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.
शरद पवार यांनी काय करावं हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. पण एकनाथ शिंदेंच्या दालनात तुम्ही येता आणि तुमच्या पक्षाची बैठक घेता, ही कृती शिवसेनेला दुखावणारी आहे,
असे संजय राऊत स्पष्ट सांगितले. शरद पवार एनडीएसोबत जाणार नाही, हे मी खात्रीने सांगतो. मला त्यांच्या विचारधारेविषयी शंका घेण्याचे कारण नाही. पण शरद पवार यांच्या कालच्या कृतीने शिवसेना अस्वस्थ आहे.
या गोष्टीची गरज नव्हती. तुम्ही महाराष्ट्राला काय दाखवताय, तुम्ही गद्दारांना प्रतिष्ठा देत आहात. गद्दारांना प्रतिष्ठा द्यायची असेल तर तुमच्या पक्षात झालेल्या गद्दारीविषयी बोलण्याचा हक्क नाही.
त्या गद्दारांविरोधात कोर्टात जाणं, लढणं, याची गरज काय? एकनाथ शिंदे हे यशवंतराव चव्हाण किंवा शंकरराव चव्हाण आहेत का, वसंतदादा पाटील आहेत की,
वसंतराव नाईक आहेत की विलासराव देशमुख आहेत की, त्यांच्या दालनात जाऊन तुम्ही बैठक घेता. ही गोष्ट आमच्या मनाला लागली आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.









