कृषी विद्यापीठात कृषि मेळावा आणि कृषी प्रदर्शनी, सहा राज्यातील शेतकरी होणार सहभागी
Farmers from six states will participate in agricultural meet and agricultural exhibition at the Agricultural University
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि परभणी आत्मा, कृषि विभाग (महाराष्ट्र शासन) यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी तथा शेतकरी कल्याण मंत्रालय (भारत सरकार), नवी दिल्ली पुरस्कृत पश्चिम विभागीय कृषि मेळावा
आणि कृषि प्रदर्शनीचे भव्य आयोजन दिनांक २१, २२, आणि २३ फेब्रुवारी, २०२४ रोजी विद्यापीठाच्या क्रीडा संकुल प्रागंणात करण्यात आल्याची माहिती कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि यांनी दिनांक १५ फेब्रुवारी रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी विस्तार शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, शिक्षण संचालक डॉ उदय खोडके, जिल्हा माहिती अधिकारी श्री अरूण सुर्यवंशी आदीसह विद्यापीठाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
माननीय कुलगुरू डॉ इन्द्र मणि पुढे म्हणाले की, कृषि मेळाव्यात पश्चिम भारतातील महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गोवा या राज्यासह दीव-दमन आणि दादर नगर हवेली येथील शेतकरी बांधव,
कृषी तज्ञ, कृषि संशोधक, धोरणकर्ते, कृषि कंपन्या, कृषि अधिकारी, कृषि विस्तारक, आणि कृषि उद्योजक हजारोच्या संख्येने सहभागी होणार आहेत.
मेळाव्यास देशातील आणि राज्यातील सन्माननीय मंत्री महोदयांना आमंत्रित करण्यात आले आहे. मेळाव्याचा मुख्य विषय ‘हवामान-अनुकूल शाश्वत शेतीद्वारे शेतक-यांची समृद्धी’ आहे.
यात चर्चासत्रे, शास्त्रज्ञ-शेतकरी संवाद आदींव्दारे विविध विषयावर तज्ञ मंडळी मार्गदर्शन करणार आहेत. मेळाव्याचा उदघाटन सोहळा दिनांक २१ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमास केंद्रीय व राज्य शासनाचे सन्माननीय मंत्री महोदयांना निमंत्रित करण्यात आले असुन राज्याचे माननीय कृषी मंत्री मा ना श्री धनंजय मुंढे हे दिनांक २३ फेब्रुवारी रोजी
समारोपीय कार्यक्रमास विशेष अतिथी येणार असुन उदघाटन कार्यक्रमास राज्य कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष मा ना श्री पाशाभाई पटेल साहेब उपस्थित राहणार आहेत.
सदर शेतकरी मेळावा आणि कृषि प्रदर्शनीच्या माध्यमातुन राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील नाविण्यपूर्ण कृषि तंत्रज्ञान, कृषि संशोधन पाहण्याची सुवर्ण संधी शेतकरी बांधवांना उपलब्ध होणार आहे.
भव्य कृषि प्रदर्शनीत अद्ययावत कृषि तंत्रज्ञानावर आधारित विविध सार्वजनिक संस्था, खासगी कंपन्या, अशासकीय संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि बचत गट यांच्या २०० पेक्षा जास्त दालनाचा समावेश राहणार आहे.
यात विषशेत: दर्जेदार बी-बियाणे, रोपे, खत, किटकनाशके, कृषि औजारे, कृषी निविष्ठा, डिजिटल तंत्रज्ञान, ड्रोन तंत्रज्ञान, आधुनिक सिंचन पध्दती, पशुधन इत्यादी दालनांचा समावेश राहील.
याप्रसंगी पीक प्रात्यक्षिक भेटी आणि खाद्य महोत्सवाचेही आयोजन करण्यात आले आहे. सर्व कृषि बांधव, कृषि उद्योजक, कृषि अधिकारी आणि कृषि विस्तारक यांनी
कृषि मेळावा आणि कृषि प्रदर्शनीचा आवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले यांनी केले आहे.
कार्यक्रमास विभाग प्रमुख डॉ राजेश कदम, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ प्रशांत देशमुख, कृषि अभियंता डॉ स्मिता सोलंकी,
अतिक व्यवस्थापक डॉ गजानन गडदे आदीसह विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी तसेच परभणी शहरातील प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी मोठया संख्येने उपस्थित होते.