शेतकऱ्यांचे होणार कर्ज माफ,महिलांना मिळणार 15,000 रुपये
Farmers' loans will be waived, women will get Rs 15,000

छत्तीसगड काँग्रेस पुन्हा सत्तेत आल्यास ‘छत्तीसगड गृहलक्ष्मी’ या योजनेंतर्गत राज्यातील महिलांना दरवर्षी १५ हजार रुपये दिले जाणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी दिले आहे.
राज्यातील विरोधी पक्ष असणाऱ्या भारतीय जनता पक्षाने राज्यातील प्रत्येक विवाहित महिलेला १२ हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे.
त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बघेल यांनी दिलेल्या आश्वासनाला राजकीयदृष्ट्या महत्त्व प्राप्त झाले आहे. राज्यात येत्या १७ नोव्हेंबरला राज्यात दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. हे पैसे थेटपणे महिलांच्या खात्यात वर्ग होणार असल्याचेही ते म्हणाले.
यापूर्वी पाच नोव्हेंबरला काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना त्यांनी राज्यात पुन्हा सत्तेत आल्यास जातिनिहाय जनगणना करण्याचे, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे व महिलांना सवलतीत ‘एलपीजी’ देण्याचे आश्वासन दिले होते.
या वेळी भाजपवर टीका करताना ते म्हणाले, भाजपने दिलेल्या आश्वासनांना कागदावरही किंमत राहिलेली नाही.
त्यांनी भरून घेतलेले फॉर्मही कचऱ्याच्या पेटीत जाताना दिसत आहेत. त्यांनी दिलेल्या आश्वासनांना कोणतीही हमी नाही.
भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आमच्या योजनांकडे पाहावे. या योजना तुमची पत्नी, आई आणि बहिणीसाठी असणाऱ्या आहेत.
आमच्या योजना समाजातील सर्व घटकांसाठी असल्याने, आमच्यावर राज्यातील जनतेचा विश्वास असल्याचेही प्रतिपादन त्यांनी केले.