मनोज जरांगेंच्या आरोपांवर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
What did Devendra Fadnavis say on Manoj Jarang's allegations?

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एक खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी
मराठा नेते मनोज जरांगे यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर सविस्तर भूमिका मांडली. “मनोज जरांगे यांचं उद्दिष्ट काय होतं? मराठा समाजाला आरक्षण देणं.
आम्ही राज्य मागासवर्ग आयोग स्थापन केला. चार लाख घरात जाऊन सर्वेक्षण केलं आणि 10 टक्के आरक्षण दिलं. पण हे असेच दिलं पाहिजे, तसंच दिले पाहिजे याला अर्थ नाही.
या गोष्टीचं राजकारण होतंय. जरांगे जेव्हा उपोषण करत होते, तेव्हा मुख्यमंत्र्यांनी सद्हेतूने त्यांना रिस्पॉन्स दिला. आम्हीही रिस्पॉन्स दिला. पण ते आता जे बोलत आहेत,
त्यावरून उद्धव ठाकरेंचा गट बोलत आहे की शरद पवार यांचा. कुणाची वाक्य बोलत होते. याबाबत शंका होती. कुणाची स्क्रिप्ट वाचत होते.
आज आम्ही पोलीसमध्ये भरती काढली. त्यात मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिले आहे. पण तरीही त्यात वेगवेगळ्या गोष्टी काढल्या जात आहेत. पण यातून मुलांना संभ्रमित केलं जातं. आंदोलन होतं. त्यांच्यावर केसेस होतात”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“जरांगे पूर्वी काय बोलत होते आणि आता काय बोलले हे पाहिलं तर ही वाक्य आहेत जे आमचे विरोधक आहेत शरद पवार आणि उद्धव ठाकरे गटाच्या भाषेत बोलत आहेत.
त्यामुळे स्क्रिप्ट कुणाची आहे. मागे कोण आहे हे बघावं लागेल. जरांगेंना दोष देण्यात फायदा काय? मागे कोण आहे हे पाहिलं पाहिजे”, अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडली.
“मनोज जरांगे यांच्या आंदोलनापासून स्वत:ला अलिप्त ठेवण्याचं कारण नव्हतं. त्या ठिकाणची भावना होती. ती पाहता मी गेल्यावर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतील असं वाटत होतं.
लाठीचार्ज पोलिसांनी केला असला तरी होम डिपार्टमेंट माझ्याकडे येतो. त्यामुळे मी गेलो नाही. हा प्रश्न सोडवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करायच्या होत्या त्या मी मुख्यमंत्र्यासोबत करत होतो.
अंतरवलीतील दगडफेकीत पोलिसांवरह दगडफेक झाली. पोलीसही मराठे होते. महिला पोलीसही जखमी झाल्या”, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
“मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख असतात. त्यांनीच सर्व गोष्टी हँडल करायचे असतात. आम्ही त्यांना मदत करायची असते. माझा जो पूर्वीचा अनुभव होता,
त्याबाबतची मदत मी त्यांना केली आहे. शेवटी अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांना घ्यायचा असतो. त्यांनी घेतला”, असं फडणवीस म्हणाले.
“शरद पवार तिकडे गेले. विरोधी पक्षाचे नेते होते, त्यांच्यासोबत काय व्यवहार झाला? त्यांना दुसऱ्या रस्त्यांनी पोलिसांना बाहेर काढावं लागलं. प्रामाणिक आंदोलक होते तसे हौसे गौसेही होते.
एका माणसामुळे चुकीच्या गोष्टींना सामोरे जावं लागलं असतं. त्यामुळे संयमाने जावं लागतं”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
“ओबीसींचं आंदोलन आम्ही संपवलं. मुख्यमंत्री मराठा सामाजाच्या कार्यक्रमात जाऊ शकतात तर ओबीसींनी काय घोडं मारलंय? त्यावेळी मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.
सरकार भेदभाव करतंय अशी ओबीसींची भावना होती. ती मुख्यमंत्र्यांना सांगितलं आणि मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून मी ओबीसींच्या आंदोलनात गेलो”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
या महिन्यात कधीही लोकसभा निवडणूक लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. जागा वाटपांपासून ते उमेदवार फायनल करेपर्यंतच्या गोष्टींवर सर्वच राजकीय पक्षांनी जोर लावला आहे.
तर, दुसरीकडे महायुतीतील घटक पक्षांबाबतची वेगवेगळी माहितीसमोर येत असल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. अजितदादा गट आणि शिंदे गटाने कमळावर लढावं असं भाजपचं म्हणणं असल्याची चर्चा आहे.
त्यासंदर्भात उलटसुलट विधानंही येत आहे. या सर्व गोष्टींना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णविराम दिला आहे.
या मुलाखतीत त्यांना शिंदे गट आणि अजितदादा गट कमळावर लढणार का? असा थेट प्रश्न करण्यात आला. त्यावर फडणवीस यांनीही थेट आणि स्पष्ट उत्तर देऊन सर्व चर्चांना पूर्णविराम दिला.
मी तुम्हाला एकच आणि स्पष्ट सांगतो, लोकसभा निवडणुकीत भाजप कमळावर, शिंदे गट धनुष्यबाण आणि अजितदादा घडाळ्यावरच लढणार आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
आम्ही तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून जागा वाटपाचा निर्णय घेणार आहोत. जागांसाठी अडून बसायचं नाही. जो निवडून येईल त्याने ती जागा लढवायची आहे. ज्याला जिंकता येईल त्याने ती जागा लढवावी, हे सूत्र आमचं ठरलं आहे.
त्यामुळे तिन्ही पक्षांसोबत न्याय होईल. कुणावरही अन्याय होणार नाही. आम्ही संख्येसाठी लढणार नाही. तर मोदींच्यापाठी महाराष्ट्र खंबीरपणे उभा राहिला पाहिजे,
त्यासाठी आम्ही लढत आहोत. कुणाला किती जागा मिळणार? कोण तिथे निवडून येईल या गोष्टी गौण आहेत, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
भाजपने फोडाफोडीचं राजकारण केलंय का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. आम्ही फोडाफोडी केलीय का हे विचारण्याऐवजी तुम्ही या विषयाला वेगळ्या पद्धतीने का पाहत नाही.
आम्ही पक्ष फोडले म्हणण्यापेक्षा त्यांना त्यांचे पक्ष वाचवता आले नाही, त्यांची काही तरी कमतरता राहिली असेल ना? असा सवाल त्यांनी केला.
त्यांचे लोकं त्यांच्यासोबत राहत नाहीत. विरोधक नेतृत्वहीन आहेत. त्यांच्याकडे नेता नाही, नीती नाही, नियत नाही अशी त्यांची अवस्था आहे.
अशा परिस्थितीत जमिनीशी जोडलेल्या नेत्यांची, कार्यकर्त्यांची घुसमट होते. नेतृत्वाचा अंधार असेल तर त्यांना काम करावं वाटत नाही. अशावेळी आमच्याकडे कुणी येत असेल तर स्वागतच करू, असं त्यांनी स्पष्ट केलं.