रोहित पवारांचा मराठवाड्यातील साखर कारखाना ईडीने केला जप्त
Rohit Pawar's sugar factory in Marathwada was seized by ED

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि आमदार रोहित पवार यांना सर्वात मोठा धक्का बसणारी बातमी समोर आली आहे.
रोहित पवार यांचा बारामती अॅग्रो कंपनीने खरेदी केलेला कन्नड सहकारी साखर कारखाना ईडीने जप्त केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीआधी ईडीची ही सर्वात मोठी कारवाई आहे.
ईडीने शिखर बँक घोटाळा प्रकरणी ही कारवाई केली आहे. या प्रकरणी गेल्या अनेक दिवसांपासून ईडीची कारवाई सुरु होती.
ईडीने या प्रकरणी अनेक ठिकाणी छापेमारी देखील केली. त्यानंतर आता कन्नड सहकारी साखर कारखाना जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे.
ईडीने शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी कन्नड सहकारी साखर कारखाना जप्त केला आहे. या जप्त केलेल्या कारखान्याची किंमत ही 50 कोटी 20 लाख इतकी आहे. या प्रकरणी 161 एकर जमीन ईडीकडून जप्त करण्यात आली आहे.
या प्रकरणात सर्वात आधी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात राष्ट्रवादीचे अनेक नेते आरोपी बनवण्यात आले होते. रोहित पवार यांचीसुद्धा जवळपास 3 दिवस चौकशी झाली होती.
सर्व कागदपत्रांची पडताळणी करण्यात आल्यानंतर ईडीकडून कन्नड सहकारी साखर कारखाना जप्त करण्यात आला आहे.
कन्नड सहकारी साखर कारखाना खरेदी करताना शिखर बँकेने जी प्रक्रिया राबवली होती ती चुकीची होती असं ईडीने म्हटलं होतं. त्यानंतर ईडीने ही कारवाई केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणी केलेल्या कारवाईची माहिती घेत ईडीने प्राथमिक तपासाला सुरुवात केली.
तसेच मुंबई हायकोर्टाने या प्रकरणी 2019 मध्ये दिलेल्या निकालाचादेखील अभ्यास करण्यात आला. या प्रकरणी मनी लाँन्ड्रींगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानंतर आता ईडीकडून सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. ईडीने कन्नड सहकारी कारखान्याची जमीन, प्लांट, यंत्रसामग्री आणि साखर युनिटची इमारत जप्त केली आहे.
कन्नड सहकारी कारखाना अवसायनात निघाला. शिखर बँकेने त्याची लिलाव प्रक्रिया सुरु केली. हा कारखाना बारामती एग्रोने अवघ्या 50 कोटी रुपयांना खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला होता.
तर लिलाव प्रक्रियेतील सहभागी कंपन्यांचे एकमेकांशी झालेले व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात अडकले होते. बारामती एग्रोशिवाय या प्रक्रियेत हायटेक इंजिनिअरिंग,
समृद्धी शुगर या लिलावात सहभागी झाल्या होत्या. यामध्ये हायटेक कंपनीने लिलावासाठी प्राथमिक 5 कोटी रुपये जमा केले ते, बारामती एग्रोने दिल्याचा आरोप आहे.
शिखर बँक घोटाळा झाल्याचा आरोप पूर्वीपासून करण्यात येत आहे. याप्रकरणात ईडीने न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती.
कन्नड सहकारी साखर कारखाना खरेदीसाठी एका कंपनीला बारामती एग्रोने कॅश क्रेडिट खात्यातून 5 कोटी रुपये दिले आणि बोली प्रक्रियेत सहभागी होण्यास सांगितल्याचा ठपका ईडीने ठेवला आहे.
पण बोली लावण्यात आलेली रक्कम ही बारामती एग्रोला खेळते भांडवल म्हणून कर्ज रुपाने दिल्याचा ईडीने म्हटले आहे. पण कर्ज रुपी रक्कम बारामती एग्रोने दुसऱ्या कारणासाठी वापरल्याचा ठपका ठेवण्यात आला.
शिखर बँकेच्या कथित 25,000 कोटी रुपयांच्या घोटाळ्याची पण चर्चा यानिमित्ताने होत आहे. कारण कन्नड सहकारी साखर कारखान्याने महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून कर्ज घेतले होते. 2012 मध्ये कारखान्याने बँकेकडून 50 कोटींचे कर्ज घेतले होते.
आमदार रोहित पवार हे बारामती एग्रोचे कार्यकारी व्यवस्थापक असल्याने त्यांना ईडीने काही महिन्यांपूर्वी समन्स बजावले होते.
त्यावेळी पण मोठा गदारोळ उडाला होता. आता ईडीने कन्नड सहकारी साखर कारखाना जप्त केला आहे. याचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे.