महायुतीत जागावाटपाबाबत दिल्लीत होणारी बैठक रद्द, काय घडले कारण ?
The meeting to be held in Delhi regarding seat allocation in the Grand Alliance was cancelled, what happened because of this?

लोकसभा निवडणुकीची घोषणा काही दिवसांवर आलेली आहे. त्यातच महायुतीत जागा वाटपावरून तिढा असल्याचं समोर आलं आहे. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार
आणि देवेंद्र फडणवीस यांची अमित शाह आणि जे. पी. नड्डा यांच्याशी चर्चा झाली. मात्र, या बैठकीतही तिढा न सुटल्याने आज दिल्लीत महायुतीची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र ही बैठक रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यात महायुतीने मिशन ४५ तर देशभरात ४०० पार चा नारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात महायुतीत जागा वाटपाच्या चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या.
मात्र, या बैठकांमध्ये तोडगा निघाला नाही. त्यातच भाजपने जास्तीत जास्त जागा लढवण्याची भूमिका घेतली आहे. तर दुसरीकडे रायगड, रत्नागिरी सिंधदुर्ग या जागांवर भाजप तयारी करत असल्याने भाजपने केसाने गळा कापू नये,
अशी भूमिका रामदास कदम यांनी मांडली होती. तसेच एकनाथ शिंदे यांनी भाजपला १३ जागांचा प्रस्ताव दिला आहे. तर दुसऱ्या बाजूला जेवढ्या जागा एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला
मिळतील तेवढ्याच जागा आम्हालाही मिळायला हव्यात, अशी भूमिका छगन भुजबळ यांनी घेतली. त्यामुळे जागा वाटपाचा तिढा कायम आहे.
अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर असताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी वैयक्तिक चर्चा केली.
मात्र, यावेळी तिढा न सुटल्याने महायुतीचे नेते बैठकीसाठी दिल्लीत गेले होते. त्यातही तिढा सुटला नाही. त्यामुळे अंतिम प्रस्तावाची बैठक आज दिल्लीत होणार होती.
मात्र पंतप्रधान मोदी यांच्या गुजरात आणि राजस्थान दौऱ्यामुळे ही बैठक पुढे ढकलण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच जागा वाटपाचा तिढा १४ तारखेला सुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
भाजपने दिल्लीत झालेल्या बैठकीत ४०० पार चा आकडा पूर्ण करण्यासाठी महायुतीतील पक्षांना तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत.
तसेच अंतर्गत वादाचा फटका बसू नये यासाठी लोकसभेसाठी जागा वाटपात अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांना मोठ्या भावाची भूमिका बजावू द्यावी.
त्याची भरपाई विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांनी लहान भावाची भूमिका घेऊन करून द्यावी, अशा सूचना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
जागा वातपसंदर्भात सुरू असलेल्या चर्चांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, आमच्यात कुठलाही तिढा नाही.
तसेच मित्रपक्षांना एक अंकी जागा मिळतील या केवळ अफवा आहेत. आम्ही मित्रपक्षांना सन्मानजनक जागा देणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीतील बैठकीनंतर सांगितले.