महायुतीत तणाव; हर्षवर्धन पाटील म्हणाले आमच्यावर दमदाटी
Tensions in the Grand Alliance; Harsh Vardhan Patil said:
महायुतीतील शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी अजित पवारांच्या विरोधाची भूमिका घेतल्यानंतर आता इंदापूरच्या हर्षवर्धन पाटलांनीही आपले पत्ते अद्याप गुलदस्त्यात ठेवल्याचं दिसतंय.
महायुतीचा धर्म सगळ्यांनीच पाळणं गरजेचं आहे, लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत जाहीर सभेत आपल्याला धमक्या मिळतात हे चुकीचं असल्याचं सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
बारामती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन पाटील, अंकिता पाटील यांच्याशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
सुरुवातीला सहज वाटणाऱ्या अजित पवारांना बारामती लोकसभेची निवडणूक काहीशी जड जाणार असल्याची चिन्हं आहेत.
शिंदे गटाच्या विजय शिवतारेंच्या बंडानंतर आता भाजपमधील नेतेही त्यांच्याविरोधात भूमिका घेण्याची शक्यता आहे. त्यात हर्षवर्धन पाटील यांनी काही स्पष्ट भूमिका घेतली नसली तरी
त्यांची कन्या अंकिता पाटील यांनी मात्र विधानसभेला मदत केली तरच लोकसभेचं काम करू असा इशारा या आधीच दिला आहे.
देवेंद्र फडणवीसांशी चर्चा झाल्यानंतर बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले की, महायुतीमध्ये असलेल्या सर्वच पक्षांनी युतीधर्म पाळला पाहिजे.
अजित पवार गटाचे नेते आपल्याला जाहीर भाषणात धमक्या देतात, दमदाटीची भाषा करतात आणि तेही लोकप्रतिनिधी मंचावर उपस्थित असताना. हे चुकीचं आहे. या सगळ्या गोष्टींवर फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की, आजच्या बैठकीत पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभेच्या निवडणुकीवर चर्चा झाली. बारामतीवर चर्चा झाली. त्यामध्ये आपल्या स्थानिक कार्यकर्त्यांची भावना काय आहे ते सांगितलं.
देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदींनी बसवण्याची जबाबदारी आपली आहे, त्यामुळे त्यासाठी लागणारे सर्व सहकार्य करणार.
जे काही स्थानिक स्तरावर निर्माण झालेले प्रश्न आहेत त्यावर चर्चा करून तोडगा काढणे आवश्यक आहे. पुढच्या बैठकीत प्रमुख कार्यकर्त्यांसह चर्चा करण्यात येणार आहे.
स्थानिक स्तरावरील प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अजित पवार यांच्याशी चर्चा करणे आवश्यक असल्याचं हर्षवर्धन पाटलांनी सांगितलं. त्यावर आपण यावर योग्य तो तोडगा काढू असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी दिला असल्याचं त्यानी म्हटलं.
गृहमंत्री अमित शहा साहेबांशी पण या प्रश्नावरती आमची चर्चा झाली आहे. एक गोष्ट निश्चित आहे की देशाच्या पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा माननीय नरेंद्र मोदी साहेबांना बसवणं ही भारतीय जनता पक्ष म्हणून
आणि महायुती म्हणून आपल्या सर्वांचेच कर्तव्य आहे, त्याबद्दल आमच्या कोणाच्या मनामध्ये शंका नाही. मात्र जे काही स्थानिक स्तरावरचे जे प्रश्न आहेत,
त्या प्रश्नामुळं जे काही विषय पुढे आलेले आहेत या विषयाच्या संदर्भात चर्चा झाली आणि आम्हाला फडणवीस साहेबांनी आणि केंद्रीय गृहमंत्री आश्वासित केलं.