इराण-इस्राईल युद्ध ;अमेरिकेने तीन भारतीय कंपन्यांवर केली कारवाई
Iran-Israel War: US takes action against three Indian companies

इराण आणि इस्राइलमध्ये संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे. इराणने केलेल्या हल्ल्यानंतर अमेरिका आक्रमक झाली आहे. इराणसोबत व्यापार करणाऱ्या जवळपास डझनभर
कंपन्यांवर अमेरिकेने बंदी आणण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे इराणची संबंध ठेवणाऱ्या तीन भारतीय कंपन्यांवर देखील अमेरिकेने कारवाई केली आहे.
युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धामध्ये इराणच्या मार्फत रशियाला ड्रोन पुरवल्याचा आरोप या कंपन्यांवर करण्यात आला आहे.
तसेच या कंपन्यांनी या करारासाठी मदत केल्याचं सांगितलं जातं. अमेरिकेच्या ट्रेजरी डिपार्टमेंटचे म्हणणे आहे की, या कंपन्यांनी इराणला
रशियासोबत करार करण्यासाठी मदत केली होती. अमेरिकेच्या म्हणण्यानुसार, या करारामध्ये मुख्य कंपनी सहारा थंडर ही आहे. याच कंपनीने ड्रोन्स विकण्यास मदत केली.
सहारा थंडरला या करारामध्ये भारताच्या तीन कंपन्यांनी मदत केल्याचा आरोप आहे. यात झेन शिपिंग, पोर्ट इंडिया प्रायवेट लिमिटेड आणि सी आर्ट शिप मॅनेंजमेंट प्रायवेट लिमिटेड या कंपन्यांचा समावेश आहे.
सहारा थंडर ही इराण सैन्य युनिटची एक मोठी शिपिंग नेटवर्क कंपनी आहे. ही कंपनी इराणच्या सुरक्षा आणि सशस्त्र दल मंत्रालयाकडून पीपल्स रिपल्बिक ऑफ चायना, रशिया, व्हेनेझुएला आणि अन्य देशांना इराणी वस्तूंची विक्री करते.
सहारा थंडरने कुक आईसलँड जहाज सीएचईएमसाठी भारतातील कंपनी झेन शिपिंग आणि पोर्ट इंडिया प्रायवेट लिमिटेड सोबत करार केला होता.
या जहाजाचे संचालन संयुक्त अरब अमिरातीमधील शिप मॅनेजमेंट एमजेडईकडून केले जाते. अमेरिकेचा दावा आहे की, सहारा थंडरने २०२२ मध्ये वस्तू पाठवण्यासाठी सीएचईएम जहाजाचा उपयोग केला आहे.
अमेरिकेच्या ट्रेजरीच्या माहितीनुसार, भारतातील सी आर्टशिप मॅनेजमेंट प्रायवेट लिमिटेड आणि यूएईमधील कंपनी ट्रान्स गल्फ एजेन्सी एलएलसीने सहारा थंडरच्या जहाजांसाठी काम केले आहे.
दरम्यान, येत्या काळात इराणवर आणखी कारवाई करण्याचे संकेत अमेरिकी सरकारने दिले आहेत. शिवाय इराणला मदत करणाऱ्या देशांवर देखील अमेरिकेची वक्रदृष्टी असणार आहे.