विधानपरिषद उमेदवारांची मतांसाठी धावाधाव ;आमदारांचा मुक्काम फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये
Legislative council candidates run for votes; MLAs stay in five star hotels
विधानसभा आमदारांमधून निवडून द्यावयाच्या विधान परिषदेवरील ११ जागांसाठी येत्या शुक्रवारी म्हणजेच १२ जुलै रोजी निवडणूक होत आहे.
सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध होईल, असं चित्र होतं, मात्र राजकीय पक्षांनी १२ उमेदवार रिंगणात ठेवल्याने ही निवडणूक अटळ झाली आहे. भाजपकडून पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत यांच्यासह पाच उमेदवार रिंगणात आहेत.
अशातच प्रत्येक पक्ष आपले उमेदवार कसा जिंकून येईल, याची रणनीती आखतांना दिसून येत आहे.. या निवडणुकीत मोठा घोडेबाजार होण्याची शक्यता लक्षात घेता प्रत्येक राजकीय पक्षाने
आपापल्या आमदारांची पंचतारांकित हॉटेल्समध्ये राहण्याची व्यवस्था केली आहे. त्या निमित्ताने का होईना आमदारांवर नजर ठेवता येईल ही यामागची भावना दिसून येत आहे.
सध्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु असल्याने विधान परिषद निवडणुकीत उभे असलेले उमेदवार हे आमदारांना आपल्यालाच मत देण्याची विनंती करताना पाहायला मिळत आहेत.
भाजपच्या तिकिटावर शेतकरी नेते सदाभाऊ खोत हे विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. सदाभाऊ खोत हे अधिवेशनात येणाऱ्या जाणाऱ्या विधानसभा आमदारांना
आपल्याला मत देण्याची विनंती करताना पाहायला मिळतात. सर्वांना नमस्कार करत “मलाच मत द्या आणि निवडून आणा” अशी विनंती करताना विधान भवन परिसरात दिसून आलेत.
प्रत्येक पक्ष मतं जुळवण्याच्या दृष्टिकोनातून आपापल्या परीने प्रयत्न करत आहे. मागील काळात राज्यसभेत मिळालेल्या दगा फटक्याने
कुठलाही पक्ष धोका पत्करण्याच्या तयारीत नाहीये. म्हणूनच प्रत्येक पक्ष आपल्या आमदारांना आज पासून मुंबईतील हॉटेल्समध्ये मुक्कामी ठेवणार आहेत
कुठले आमदार कुठे राहणार?
ठाकरे गट आमदार – परळ येथील ITC ग्रँड मराठा हॉटेलमध्ये राहणार
शिंदे गट आमदार – वांद्रे येथील ताज लँड्स एन्ड हॉटेलमध्ये राहणार
भाजपचे आमदार – कुलाबा कफ परेड येथील ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये राहणार राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गट आमदार हॉटेल ट्रायडेंटमध्ये राहणार
या निवडणुकीत गुप्त मतदान पद्धती असल्याच्या कारणास्तव घोडाबाजार होणार हे मात्र नक्की! विधान भवनाच्या आवारात मात्र सर्वत्र चर्चा
या निवडणुकीची रंगताना पाहायला मिळते आहे. १२ जुलै रोजी होणाऱ्या या निवडणुकीत सदाभाऊ खोत निवडून येतात का, कोणाचा पराभव होणार, हे पाहणं रंजक ठरणार आहे