येत्या ९ दिवसात काहीतरी…… ! शिंदे गटाच्या नेत्याच्या विधानाने राजकीय चर्चाना उधाण

Something in next 9 days...... ! Shinde group leader's statement sparks political debate

 

 

 

 

शिवसेनेतील बंडखोरीनंतर महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आणि शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं. तेव्हापासून शिंदे गटाच्या नेत्यांकडून लवकरच मंत्रीमंडळ विस्तार होणार असल्याबाबत अनेकदा दावा करण्यात आला.

 

 

मात्र, अद्यापही शिंदे गटातील काही नेत्यांना मंत्रीमंडळात स्थान मिळालेलं नाही. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही बंडखोरी होऊन अजित पवार गटातील नेत्यांना मंत्रीपदं मिळाली.

 

 

यामुळे पालकमंत्रीपदाचाही वाद निर्माण झाला आणि शिंदे गट – अजित पवार गटाचे नेते आमनेसामने आले. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे आमदार भारत गोगावले यांनी मंत्रीमंडळ विस्तारावर सूचक वक्तव्य केलं आहे.

 

 

 

भरत गोगावले म्हणाले, “हिवाळी अधिवेशनाला वेळ आहे. या अधिवेशनाला अद्याप ९ दिवस बाकी आहेत. या ९ दिवसात काहीही घडू शकेल, त्याबाबत काही सांगू शकत नाही.

 

 

आमचे कोट तयार आहेत. त्या कोटची कुणीही काळजी करू नये. ते कोट काही फुकट जात नाहीत. ते सांगतील तेव्हा आम्ही हे कोट बाहेर काढू.”

 

 

“आम्ही शिवसैनिक कायम तयारीत असतो. त्यामुळे काळजी करायचं काही कारण नाही. त्यांनी या क्षणाला जरी सांगितलं तरी आम्ही तयार आहोत.

 

 

यावेळच्या मंत्रीमंडळ विस्ताराबाबत मी १०० टक्के आशावादी आहे. मी का आशावादी नसावं. आम्ही काम करतो. काम करणाऱ्यांनी आशावादी नाही राहायचं,

 

 

मग काम न करणाऱ्यांनी आशावादी राहायचं का?” असा सवाल करत भरत गोगावले यांनी आपली मंत्रीपदाची इच्छा पुन्हा एकदा व्यक्त केली.

 

 

दरम्यान शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात आता शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांची उलट तपासणी होणार आहे. शिवसेना शिंदे गटाच्यावतीने साक्ष, पुरावे आणि प्रतिज्ञापत्र विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द करण्यात आले आहेत.

 

 

शिवसेना शिंदे गटाच्या जवळपास 5 आमदार आणि एका खासदाराची साक्ष नोंदवली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. सध्या ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांची सलग पाच दिवस उलट तपासणी होत आहे.

 

 

 

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणामध्ये दोन्ही गटांना आपली साक्ष पुरावे आणि प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी 18 नोव्हेंबर पर्यंत वेळ देण्यात आली होती.

 

 

 

मात्र शिंदे गटाने विधानसभा अध्यक्षांकडे हे पुरावे सादर करण्यासाठी अधिकचा वेळ मागितला होता. त्यानंतर 24 नोव्हेंबरला साक्ष, पुरावे आणि प्रतिज्ञापत्र शिवसेना शिंदे गटाने विधानसभा अध्यक्षांकडे सादर केले.

 

 

आता यामध्ये शिवसेना शिंदे गटाकडून आमदार आणि मंत्री दीपक केसरकर , उदय सामंत ,दिलीप लांडे ,योगेश कदम , भरत गोगावले आणि खासदार राहुल शेवाळे यांची साक्ष नोंदवली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

 

शिवसेना शिंदे गटाचे प्रतोद म्हणून भरत गोगावले यांची उलट तपासणी आणि साक्ष नोंदवली जाईल. ज्यामध्ये ठाकरे गटाचे वकील त्यांना प्रश्न विचारतील.

 

 

तर दाखल केलेल्या प्रतिज्ञा पत्रानुसार आणि रेकॉर्डवर आलेल्या माहितीनुसार शिंदे गटाच्या इतर पाच आमदार आणि खासदारांना सुद्धा विविध मुद्द्यांवर प्रश्न आणि उपप्रश्न ठाकरे गटाचे वकील करतील.ठाकरे गटाकडून देवदत्त कामत तर शिंदे गटाकडून महेश जेठमलानी युक्तीवाद करत आहेत.

 

 

 

दरम्यान, ठाकरे गटाचे आमदार आणि प्रतोद सुनील प्रभू यांची सलग तीन दिवस उलट तपासणी होत आहे. शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी हे प्रभूंची उलट तपासणी घेत आहेत.

 

 

21 जून 2022 च्या ठरावावरून प्रभू यांना सवाल करण्यात आले. 21 जूनचा ठराव कधी तयारच केला नव्हता असा दावा शिंदे गटाचे वकील जेठमलानींनी केला. हा दावा सुनील प्रभूंनी फेटाळला.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *