महायुती आणि मविआत जागावाटपाच्या हालचाली तीव्र
Movement of seat sharing between Mahayuti and Maviat intensified
लोकसभेत झालेल्या पराभवानंतर भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात उतरणारण्यासाठी तयार झाले आहेत.
स्वत: सुजय विखे पाटलांनी राहुरी आणि संगमनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
अहमदनगर लोकसभेतून शरद पवार गटाच्या निलेश लंकेंनी सुजय-विखे पाटलांचा पराभव केला होता. त्यामुळे पुन्हा सुजय-विखे पाटील निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत.
सुजय विखे पाटलांनी राहुरी आणि संगमनेर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. संगमनेरमध्ये सध्या काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आमदार आहेत.
दरम्यान या मतदारसंघातून सुजय विखेंना तिकीट मिळाल्यास त्यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे. तर राहुरीमध्ये शरद पवार गटाचे
प्राजक्त तनपुरे आमदार आहेत. त्यामुळे या मतदारसंघातून तिकीट मिळाल्यास प्राजक्त तनपुरे आणि सुजय विखे पाटलांमध्ये सामना रंगण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून अजित पवार गटाकडून नरहरी झिरवाळ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान झिरवाळ यांना जाहीर केलेल्या उमेदवारीनंतर शिंदे गटाकडून आक्षेप घेण्यात आला आहे.
कारण या मतदारसंघातून शिंदे गटाकडून धनराज महाले निवडणुकीच्या मैदानात उतरण्यावर ठाम आहेत. पण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी
दिंडोरी मतदारसंघातून नरहरी झिरवाळ यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर शिंदे गटाकडून धनराज महाले देखील निवडणूक लढवण्यावर ठाम आहे.
धनराज महाले हे शिवसेनेचे माजी आमदार आहेत. त्यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीत प्रवेश केला होता आणि लोकसभा निवडणूक लढवली होती.
पण त्यावेळी भाजपच्या भारती पवार यांच्याकडून धनराज महाले यांचा पराभव झाला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सत्तेत सहभागी झाल्यानंतर धनराज महाले यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केला होता.
एकीकडे महायुतीत जागावाटपावरुन रस्सीखेच निर्माण होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे मविआत देखील जागवाटपावरुन वादाची चिन्हं आहेत.
ठाकरे गटाकडून नाशिकमधल्या 2 जागांवर उमेदवारांबाबत ठराव मंजूर करण्यात आला आहे. नाशिक पश्चिममधून सुधाकर बडगुजर
तर नाशिक मध्य मतदारसंघातून वसंत गीते निवडणूक लढवणार असल्याचा ठराव मंजूर करण्यात आल्याच स्वत: बडगूजर यांनी म्हटलंय.
मुंबईत काँग्रेस आणि ठाकरे गटात जागावाटपावरुन वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. कारण काही दिवसांपूर्वी मुंबईतील 36 जागांपैकी 25 जागा ठाकरे गट लढवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली होती.
दरम्यान ठाकरे गटाच्या या 25 जागांपैकी काही जागा तसेच इतर 16 जागांवर काँग्रेसकडून मोर्चेबांधणी सुरु करण्यात आली आहे. यासाठी काँग्रेसकडून मुंबईत विशेष यात्रेचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
काँग्रेसकडून कुलाबा, मुंबादेवी, भायखळा, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, मलबारहिल, धारावी, भायखळा, वडाळा, अणुशक्ती नगर, चांदिवली या जागांसाठी मोर्चेबांधणी सुरु आहे.
मुंबईत 2019च्या विधानसभेत महायुतीत असताना 36 पैकी शिवसेनेनं 19 जागा लढवल्या त्यातील 14 जागांवर शिवसेनेने विजय मिळवला. तर 2019 मध्ये महाआघाडीत काँग्रेसनं तब्बल 28 जागा लढवल्या. मात्र त्यांना केवळ 4 जागा जिंकता आल्या होत्या.
यंदा झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत मुंबईतील 6 जागांपैकी 3 जागांवर ठाकरे गटानं विजय मिळवला. तर काँग्रेसला 1, शिंदे गट एक आणि भाजपला एक जागा जिंकता आली.
विधानसभेचा रणसंग्राम सुरु होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्षाकडून विधानसभेच्या पार्श्वभूमीवर
जोरदार तयारी करण्यात येतं आहे. मात्र, महायुती असो किंवा मविआ यांच्यात जागावाटपावरुन रस्सीखेच निर्माण होण्याची शक्यता आहे.