जगाच्या इतिहासातील पहिली घटना ! पती पत्नीच्या भांडणात विमानाची इमर्जन्सी लँडिंग
The first incident in the history of the world !Emergency landing of a plane in the quarrel of husband and wife
पतीपत्नीच्या भांडणामुळे चक्क विमान थांबवायला लागल्याचा अजब प्रकार बुधवारी दिल्लीत घडला. म्युनिचहून बँकाँकला जाणारे लुफ्थांसा या हवाई वाहतूक कंपनीचे एलएच-७७२ हे विमान अचानक दिल्लीतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर थांबविण्यात आले.
या घटनेबद्दल ‘लुफ्थांसा’ने दिलेल्या माहितीनुसार या विमानातून प्रवास करणाऱ्या एका जोडप्यात काही कारणावरून वाद झाले.
या प्रकरणी संबंधित महिलेने वैमानिकाकडे तिच्या पतीची तक्रार केली. या महिलेचा पती तिच्याशी असभ्य वर्तन करत असून तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत असल्याचे तिने सांगितले.
यानंतर विमानातील कर्मचाऱ्यांनी या वादात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा काही उपयोग झाला नाही. या महिलेवर तिच्या पतीने अन्न पदार्थ फेकले,
तसेच तिचे पांघरूण जाळण्याचा प्रयत्न केला. या नंतर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत वैमानिकाने दिल्लीतील इंदिरा गांधी विमानतळ प्रशासनाशी संपर्क साधत तेथे विमान उतरविण्याची परवानगी मागितली.
दिल्लीत विमान उतरविल्यानंतर या महिलेच्या पतीला केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांच्या ताब्यात देण्यात आहे. संबंधित व्यक्ती हा जर्मनीचा नागरिक असून महिला ही थायलंडची नागरिक आहे.
दरम्यान, महिलेच्या पतीने माफी मागितली असून त्याला जर्मन दूतावासाच्या ताब्यात द्यावे, दिल्ली पोलिसांच्या ताब्यात द्यावे की जर्मनीला पाठवून द्यावे याबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.