दहा लाखांची फसवणूक प्रकरणात माजी आमदारावर गुन्हा दाखल
A case has been registered against the former MLA in the fraud case of 10 lakhs

शिक्षण संस्थेत नोकरी देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीकडून दहा लाख रुपये घेत फसवणूक केल्याप्रकरणी माजी आमदार अपूर्व हिरे यांच्यासह चौघांविरुद्ध उपनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बोगस शिक्षक भरती प्रकरणानंतर पुन्हा शहर पोलिसांत हिरेंबाबत गुन्हा दाखल झाल्याने त्यांचा पाय खोलात गेला आहे. मात्र, त्यांनी या गुन्ह्यातील फिर्यादीसह संशयितांना ओळखत नसल्याचा दावा करून आरोप फेटाळले आहेत.
वडनेर गेट परिसरातील रहिवाशी उत्तम काळू चौधरी (वय ६४) यांनी केलेल्या तक्रार अर्जाची शहानिशा केल्यानंतर उपनगर पोलिसांनी पोलिस उपायुक्तांची परवानगी घेत गुन्हा दाखल केला.
त्यामध्ये कल्पेश प्रभाकर बोरसे, दीपक झिपरू चव्हाण, अमर रामराजे व अपूर्व हिरे या संशयितांची नावे आहेत. चौधरींची नातलगामार्फत कल्पेशसोबत भेट झाली. तेव्हा फिर्यादींचा मुलगा दीपक याला नोकरी लावून देण्याचा विषय निघाला.
महात्मानगरातील एका कार्यालयात भेट झाल्यावर तेथे हिरेदेखील होते, असा फिर्यादीत उल्लेख आहे. या प्रकरणात फिर्यादीने सन २०१७ मध्ये चेकद्वारे व सन २०१९ मध्ये रोख पैसे दिले.
एकूण दहा लाख रुपये देताना इतर संशयितांशीही त्यांचा संबंध आला. १५ नोव्हेंबर २०२२ पर्यंत नोकरी न लागल्याने फिर्यादींनी वारंवार चौकशी केली.
संशयितांपैकी एकाने दिलेले दोन चेक आतापर्यंत बाउन्स झाले आहेत. तर पैसे व नोकरी यापैकी काहीच न मिळाल्याने फिर्यादींनी तक्रार अर्ज दाखल केला होता.
दरम्यान, नोव्हेंबरच्या सुरुवातीला शिक्षणसेवक नियुक्तीची संगनमताने बनावट कागदपत्रे तयार करुन भरती केल्याप्रकरणी भद्रकाली व नाशिकरोड पोलिसांत मालेगावातील एका शैक्षणिक संस्थेसह प्रशासकीय अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला.
त्यामध्ये माजी मंत्री प्रशांत हिरे, पत्नी स्मिता हिरे, माजी आमदार अपूर्व हिरे आणि जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष अद्वय हिरे यांसह सर्व २५ संशयितांना जामीन मंजूर झाला.
त्यानंतर सध्या रेणुकादेवी सूतगिरणी कर्ज थकविल्याप्रकरणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते डॉ. अद्वय हिरे हे न्यायालयीन कोठडीत आहेत.
त्यातच माजी आमदार अपूर्व हिरे यांच्यासह चौघांवर उपनगर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने राजकीय दावे-प्रतिदावे सुरू आहेत.