ठाकरेंच्या मनसेला मुस्लिमांची आठवण ,निघाले अजमेरला खाजा गरिबनवाझ यांच्या दारी
Remembering Muslims in Thackeray's MNS, Khaja Garibnawaz left Ajmer

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आक्रमक हिंदुत्वाचा पुरस्कार करतात. तर दुसरीकडे त्यांच्या पक्षाचे नेते दिलीप धोत्रे मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यासाठी मुस्लिमांसोबत अजमेर शरीफ यात्रेला निघाले आहेत.
त्यावरून जोरदार राजकारण सुरू झालंय. तर मनसेला उशिरा शहाणपण सुचल्याचा जोरदार टोला संजय राऊतांनी लगावला आहे.
मशिदींवरील भोंगे काढले नाही तर मशिदीसमोर हनुमान चालिसा म्हणण्याचा इशारा राज ठाकरेंनी दिला होता. त्यानंतर मशिदींवरील अनधिकृत भोंगे काढण्यात आले होते.
भोंग्यांचा आवाज मर्यादितही करण्यात आला होता. तसं पाहिलं तर राज ठाकरेंनी मराठी माणसांच्या हक्कासाठी मनसेची स्थापना केली होती.
मात्र चार वर्षांपूर्वी अंगावर भगवी शाल घेऊन राज ठाकरेंनी पुन्हा एकदा आक्रमक हिंदुत्वाचा अंगीकार केला. हिंदू हृदयसम्राट अशी त्यांना उपमा देण्यात आली.
मात्र त्यांच्याच पक्षाचे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार दिलीप धोत्रे मुस्लिमांना घेऊन अजमेर शरीफला दर्शनासाठी निघाले आहेत.
राज ठाकरेंच्या आक्रमक पवित्र्यानंतर मुंबईतल्या माहिममधली समुद्रातील मजार हटवण्यात आली होती. राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून टीकाही केली होती.
मात्र, आता राज ठाकरेंच्या पक्षाच्या नेत्यानं मुस्लिमांसाठी यात्रा काढल्यानं संजय राऊतांनी चांगलेच कान टोचले. संजय राऊतांनी मनसेचं शहाणपण काढलं तर शिवसेनेच्या संजय शिरसाट यांनी दिलीप धोत्रेंच्या यात्रेचं समर्थन केलं.
लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंना मुस्लिम मतं मिळाल्याचा आरोप महायुती आणि मनसेकडून वारंवार करण्यात येतोय. भाजपकडून तर ‘‘व्होट जिहाद’’ अशी टीका करण्यात आली.
आणि आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसेलाच मुस्लिमांना अजमेर यात्रेवर नेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी त्यांच्याच सभेत उच्चारलेल्या, “मौका सब को मिलता हैं”, या डायलॉगची आठवण झाली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांच्या संकल्पनेतून दर्शन यात्रा काढण्यात आली आहे. अजमेर येथील राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक असलेल्या
भारतातील मुस्लिमांचे पवित्र स्थळ असलेल्या ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांची समाधीस्थळ दर्गा आहे. या समाधी स्थळाचे दर्शन मुस्लिम बांधवांना घडावे या हेतूने धोत्रे यांनी अजमेर दर्शन यात्रेचं आयोजन करण्यात आले आहे.
या दर्शन यात्रेसाठी पंढरपूर-मंगळवेढ्यातील हजारो मुस्लिम बांधव अजमेर शरीफ यांच्या दर्शनासाठी पंढरपूर येथून शुक्रवारी सकाळी अजमेरकडे रवाना झाले आहेत. या दर्शन यात्रेची सुरुवात पंढरपूर येथील मुर्शिदबाबा दर्गा इथं पुष्पहार अर्पण करून झाली.
यावेळी सर्व मुस्लिम बांधवांनी दिलीपबापू धोत्रे यांच्यासाठी प्रार्थना केली. यावेळी मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी पंढरपूर मंगळवेढ्यातील मुस्लिम बांधवांसाठी 20 हून अधिक लक्झरी बसेसची सुविधा सोय केली आहे.