मराठवाड्याला पावसाने झोडपले ;हवामान विभागाचा अंदाज काय?

Marathas were hit by rain; Damage to orchards and crops

 

 

 

राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाली असून मध्यरात्रीपासूनच ढगांच्या गडगडाटासह पाऊस सुरू झाला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातही पावसाने जोरदार हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

 

पुणे, सोलापूर, सांगली, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, हिंगोली, परभणीसह अनेक जिल्ह्यात वरुणराजाचं आगमन झालं आहे. मात्र, या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत असून

 

अनेक ठिकाणी फळबागा धोक्यात आल्या आहेत. तर, काही ठिकाणी खरीपची पिकेही पाण्यात गेल्याचं चित्र आहे. पुणे शहरात अचानक दुपारी आलेल्या मुसळधार पावसामुळे पुणेकरांची चांगलीच दमछाक झाली.

 

पुणे शहरासह ग्रामीण भाग, त्याचबरोबर धरण क्षेत्रात देखील पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यानंतर, पुण्यातील टिळक रस्त्यावर पाणी साचलं होतं, अनेक रस्त्यांवर पाणी साचलेलं असून रस्त्यांवर स्लो ट्रॅफिक पाहायला मिळतंय.

 

 

हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील तीन ते चार दिवस असाच पाऊस पुणे शहर आणि आजूबाजूच्या परिसरात असणार आहे. तसेच, राज्यातील विविध भागात पुढील 3 ते 4 दिवस पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

 

सांगली शहरासह जिल्ह्याच्या अनेक तालुक्यात मुसळधार पावसाचे दमदार आगमन झाले. जिल्ह्यातील तासगाव, पलूस तालुक्यासह खानापूर माथ्यावर अनेक भागात सलग पाऊस झाला आहे.

 

सलगच्या पावसामुळे कृष्णा नदीही दुथडी भरून वाहू लागली. या पावसामुळे द्राक्ष बागांमध्ये पाणी साचून राहू लागले, द्राक्ष बागाची फळ छाटणी खोळंबली असून छाटलेल्या द्राक्षबागा वांझ जाण्याची भीती द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आहे.

 

एका दिवसाच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. दुपारच्या सुमारासह विजांच्या गडगडाटासह वादळी वारे आणि जोरदार पावसाला सुरुवात झाली.

 

 

अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचायला सुरुवात झालीय. ऐन सोयाबीन काढणीच्या हंगामात पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांच्या हातात जे उरले आहे, तेही हातातून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

 

 

हिंगोली जिल्ह्यांमध्ये आज दुपारनंतर जोरदार स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आहे. कालपासून हिंगोली जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण होते, आज दुपारी तापमानात सुद्धा वाढ झाली होती.

 

मात्र, आता जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. उकाड्याने त्रस्त झालेल्या हिंगोलीकरांना या पावसामुळे दिलासा मिळाला आहे. परंतु शेतातील काढणीला आलेल्या सोयाबीनच्या पिकाला

 

या पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका बसतोय. अनेक ठिकाणी सोयाबीन कापणीचे काम सुरू आहे, परंतु पावसाने हजेरी लावल्यामुळे कापलेले सोयाबीन पाण्यामध्ये भिजताना दिसून येते.

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडीतील भुईबावडा घाटात काल ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळल्याने घाटात बारा ठिकाणी दरडी तर दोन ठिकाणी संरक्षक भिंत खचून वाहतूक बंद झाली.

 

 

गेल्या 20 तासांपेक्षा जास्त काळापासून भूईबावडा घाटातील वाहतूक बंद आहे. तसेचस दरड हटविण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू असून जेसीबीच्या साहाय्याने घाटातील दरड बाजूला करण्यात येत आहे.

 

 

रायगड जिल्ह्याला पुढील काही तासात जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. रायगड जिल्ह्याला आज ऑरेंज तर उद्या रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. माणगाव, महाड, म्हसळा आणि श्रीवर्धन तालुक्यातदेखील आज मुसळधार पाऊस सुरू झाला आहे.

 

 

पालघर जिल्ह्यात कालपासून अधून-मधून विजांच्या कडकडाटासह पाऊस होत आहे. हवामान खात्याकडून आज यलो, उद्या ऑरेंज आणि

 

परवा रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे मोठा पाऊस झाल्यास पिकून आलेल्या हळव्या भातशेतीचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

 

 

सध्या सर्वत्र धो-धो पावसाला सुरुवात झाली आहे. राज्यात विविध ठिकाणी जोरदार पाऊस कोसळत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

 

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील चार दिवस महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस सक्रीय झाला आहे.

 

हवामान खात्याकडून कोकण, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. येत्या मंगळवारपासून पुढील चार दिवस महाराष्ट्रात ठिकठिकाणी वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

 

 

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मान्सूनने पश्चिम राजस्थानपासून परतीचा प्रवास सुरू केला

 

असून आता मान्सून गुजरातमधील कच्छ भागापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे.

 

 

राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. यामुळे काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

 

हवामान विभागाने पालघर, ठाणे, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सांगली, सोलापूर, संभाजीनगर, जालना, लातूर, धाराशिव, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यात यलो अलर्ट जारी केला आहे. तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, परभणी, बीड, हिंगोली, नांदेडकरता पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दिला आहे.

 

 

सध्या वसई-विरारमध्ये पावसाची संततधार सुरु आहे. रिमझिम पावसासह अधून मधून जोरदार पाऊस पडत आहे. वसई-विरार परिसरात आभाळ पूर्णतः भरून आले असून हवेत गारवा निर्माण झाला आहे.

 

सध्या विरार ते चर्चगेट लोकल सेवा आणि शहरतील वाहतूक सुरळीत आहे. तर पालघरमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळी वारा सुटला आहे.

 

त्यामुळे पालघर तालुक्यातील सफाळे पूर्व भागात असलेल्या घाटीम परिसरामध्ये चार घरांचे पत्रे उडून मोठे नुकसान झाले आहे.

 

तर काही घरांमध्ये पाणी साचले आहे. पालघरमध्ये परतीच्या पावसामध्ये मोठे नुकसान झाल्याने नुकसान भरपाई द्या, अशी मागणी शासनाकडे केली आहे.

 

सोलापूर शहर आणि परिसरात रात्रभर मुसळधार पाऊस कोसळला. सोलापूर जिल्ह्याला आज आणि उद्याही ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे. साधारण पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा एकदा जोर धरला आहे.

 

सोलापुरात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सोलापूर शहर आणि परिसरात पुढील चार ते पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

 

तर अहमदनगर शहरासह जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले आहे. अहमदनगर शहराच्या बाजूने वाहत असलेल्या सीना नदीला पूर आला आहे.

 

सीना नदीला आलेल्या पुरामुळे नगर – कल्याण महामार्गवरील पूल पाण्याखाली गेला आहे. नगर कल्याण महामार्ग वाहतुकीसाठी बंद पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात आली आहे.

 

हवामान खात्याने पुढील तीन दिवस नगर जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यामुळे रस्त्यांना नाल्यांचे स्वरूप आले आहे.

 

 

 

पुण्याच्या भोर तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसानं माझेरी गावात गुरांचा गोठा कोसळल्याची घटना घडली आहे. गोठा कोसळ्याने गोठ्यातील पाच जनावरे जखमी झाले आहेत.

 

या घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होतं, ही जनावरे गोठ्यातून बाजूला काढली.

 

तर पशुसंवर्धन विभागाकडून जनावरांवर औषधोपचार करण्यात आले आहेत. गोठा पडल्याने शेतकरी राघू दिघे या शेतकऱ्याचं मोठं नुकसान झाले आहे.

 

याप्रकरणी पंचनामा करून शासनाकडून शेतकऱ्याला तातडीने नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *